Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विधवा महिलेवर बड्या राजकीय नेत्याकडून बलात्कार; एकनाथ खडसेंच्या आरोपाने जिल्ह्यात खळबळ

विधवा महिलेवर बड्या राजकीय नेत्याकडून बलात्कार; एकनाथ खडसेंच्या आरोपाने जिल्ह्यात खळबळ
 

जळगाव: एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलीस प्रशासनावर तसेच सत्ताधारी नेत्यांवर अत्यंत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. सावदा परिसरातील एका विधवा महिलेवर एका वरिष्ठ राजकीय पदाधिकाऱ्याने बलात्कार केल्याचा दावा त्यांनी केला असून, या प्रकरणात पोलीस तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

खडसे यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिला तक्रार नोंदवण्यासाठी सावदा पोलीस ठाण्यात सकाळी गेली होती आणि दुपारी 12 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ती ठाण्यात थांबली होती. मात्र, पोलीस निरीक्षकांनी तिची तक्रार दाखल करून न घेता तिला धमकावून घरी पाठवले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. "एका मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्याविरुद्ध बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याची तक्रार नोंदवली जात नाही, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे," असे खडसे म्हणाले.
दरम्यान, सावदा पोलीस ठाण्यात खडसे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनावर आक्रमक भूमिका घेत टीका केली आहे. संबंधित पोलीस निरीक्षकाला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत, गुन्हे नोंदवण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात हेराफेरी होत असल्याचा दावा त्यांनी केला.
 
यावेळी खडसे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा उल्लेख करत एक छायाचित्र प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने मंत्र्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावरील स्टेटसवर ठेवले असल्याचा दाखला देत, अशा माध्यमातून अधिकाऱ्याला राजकीय वरदहस्त मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, संबंधित पोलीस निरीक्षकाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना खडसे म्हणाले की, हा अधिकारी केवळ गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही, तर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असे वातावरण तयार करत आहे.
"सात-सात तास पोलीस ठाण्यात थांबूनही एका बलात्कार पीडितेला न्याय मिळत नसेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. संपूर्ण घटना पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती मला मिळाली असून, त्या फुटेजची मागणी केली आहे. मात्र अद्याप ती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही," असेही खडसे यांनी स्पष्ट केले. या आरोपांमुळे जळगाव जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित प्रकरणात पोलीस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.