सांगली : '६५ नाद सांगलीकरांचा' म्हणून सोशल मीडियावर रील्स माध्यमातून पोलिसांना 'चॅलेंज' देणाऱ्या घोडागाडी चालकांसह हुल्लडबाज तरुणांना यंदाही पोलिसांनी मिरजेपासून सांगलीपर्यंत चोपले. दोन दिवस पोलिस दलाला 'चॅलेंज' देणाऱ्या रील्सनंतर शुक्रवारी पोलिसांनी त्यांना चोप दिल्याच्या 'रील्स' सोशल मीडियावर चांगल्याच 'व्हायरल' झाल्याचे पाहायला मिळाले.
कर्नाटकातील मायाक्का देवी यात्रा संपल्यानंतर चिंचली ते सांगलीवाडीपर्यंत ६५ किलोमीटर घोडागाडी शर्यतीचा थरार गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळतो. कर्नाटकातून सांगलीवाडीपर्यंत 'नॉनस्टॉप' दंगामस्ती, आरडाओरड करणाऱ्या हुल्लडबाजांमुळे अनेकांना त्रास होतो. कर्नाटक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर हुल्लडबाजी थांबली होती.
गतवर्षी यात्रेचा मुख्य दिवस संपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास शेकडो दुचाकीस्वार आणि घोडागाडी चालक आरडाओरड करत मिरजेतून सांगलीत घुसले. पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर टिळक चौकात सर्वांना अडवून चोप देण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक जण दुचाकी टाकून पळाले. पोलिसांनी नंतर त्यांच्यावर कारवाई केली. गतवर्षी चोप दिल्यानंतर हुल्लडबाजांना आळा बसेल अशी शक्यता होती. परंतु 'नाद करा, पण आमचा कुठं' अशा प्रकारच्या रील्स दोन दिवसांपासून चांगल्याच व्हायरल झाल्या होत्या.'६५ चिंचली ते सांगली' अशी बेकायदा शर्यत निघणारच असे पोलिसांना एकप्रकारे 'चॅलेंज' दिले होते. निवडणूक बंदाेबस्तामुळे पोलिस ठाण्याकडे कुमक कमी होती. तरीही गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास म्हैसाळ येथे पोलिसांनी हुल्लडबाजांना रोखले. त्यानंतर मिरजेत पोलिस निरीक्षक किरण चौगले यांच्या पथकाने रोखले. त्यानंतरही शेकडो दुचाकीस्वार पोलिसांना न जुमानता सांगलीकडे रवाना झाले.
परंतु
सांगलीत हरभट रस्ता ते टिळक चाैकापर्यंत वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक
मुकुंद कुलकर्णी व त्यांचे कर्मचारी तसेच शहर ठाण्याचे निरीक्षक अरुण
सुगावकर व कर्मचारी काठ्या घेऊन सज्ज होते. पोलिसांच्या नाकावर टिच्चून
हुल्लडबाजी करत शेकडो दुचाकीस्वार सांगलीत दाखल झाल्यानंतर पोलिसांनी
त्यांच्यावर काठ्या उगारल्या. त्यामुळे अनेकांची पाठ सोलून निघाली. काही
जणांनी दुचाकी टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना चांगलाच
प्रसाद मिळाला. मध्यरात्रीनंतर पोलिस आणि हुल्लडबाज यांच्यातील हा थरार
पाहण्यासाठी टिळक चाैक परिसरात नागरिकांची गर्दी जमली होती.
हुल्लडबाजांवर कारवाई करणार
दरवर्षीप्रमाणे यंदाही आरडाओरड व दंगामस्ती करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस कर्मचारी कॅमेरे घेऊन सज्ज होते. अनेकांचे शूटिंग करण्यात आले आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यातदेखील काहींना टिपले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.