५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवून देणारी राज्य सरकारची योजना कोणती? जाणून घ्या अटी
 

राज्यातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २ जुलै २०१२ रोजी राज्यातील आठ जिल्ह्यांत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. २१ नोव्हेंबर २०१३ ला या योजनेचा विस्तार राज्यातील २८ जिल्ह्यांत करण्यात आला. त्यानंतर या योजनेचे ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना’ (MJPJAY) असे नामकरण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आलेली ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये MJPJAY अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत आणि आयुष्मान भारत अंतर्गत वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळते. ही योजना काय आहे? त्यासाठी पात्रता काय? पाच लाखांपर्यंत मोफत उपचार कोणाला मिळतो? जाणून घेऊयात…

पाच लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण कसे मिळते?
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचारांसाठी कॅशलेस (रोखविरहित) वैद्यकीय सेवा प्रदान केल्या जातात. सुरुवातीला केवळ कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी मर्यादित असलेली ही योजना आता राज्यातील सर्व कुटुंबांसाठी लागू करण्यात आली आहे. यामध्ये MJPJAY अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत आणि आयुष्मान भारत अंतर्गत वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळते. १ जुलै २०२४ पासून, ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला सर्वसमावेशक आणि मोफत आरोग्य सेवा प्रदान करते.
रुग्णाला फायदा कसा होतो?

रुग्णालयात भरती होण्याचा खर्च (जनरल वॉर्डमधील बेड चार्जेस, नर्सिंग आणि बोर्डिंग शुल्क, वैद्यकीय अधिकारी आणि सल्लागारांची फी)
वैद्यकीय खर्च (ऑक्सिजन, ऑपरेशन थिएटर आणि आयसीयू सुविधांचे शुल्क, सर्जिकल उपकरणे, औषधे इत्यादी खर्च)
रुग्णालयात भरती असताना रुग्णासाठी अन्नाची सोय.
प्रवास खर्च, जसे की रुग्णालयातून रुग्णाच्या निवासस्थानी जाण्यासाठी लागणारा एसटी बसचा किंवा रेल्वेच्या द्वितीय श्रेणीचा एकवेळचा प्रवास खर्च.
रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, मृतदेह रुग्णालयापासून त्याच्या गावापर्यंत किंवा शहरापर्यंत पोहोचवण्याचा खर्च.
रुग्ण दाखल झाल्यापासून डिस्चार्ज मिळेपर्यंतचा सर्व खर्च, तसेच उपचारादरम्यान उद्भवणाऱ्या गुंतागुंतीचा खर्च यामध्ये समाविष्ट आहे.
 
योजनेचा विस्तार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजने’अंतर्गत उपचार केल्या जाणाऱ्या आजारांच्या संख्येत वाढ करण्याची घोषणा केली. या योजनेखाली आता १,३०० ऐवजी सुमारे २,३९९ आजारांवर उपचार केले जातील. MJPJAY आणि आयुष्मान भारत अंतर्गत रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. फडणवीस म्हणाले की, काही विशिष्ट आजार निश्चित करण्यात आले आहेत ज्यांच्यासाठी १० लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचे उपचार मोफत दिले जातील. मंत्रिमंडळाने विविध आजारांच्या उपचारांसाठी विशेष पॅकेजेसनाही मंजुरी दिली आहे.
आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “या निर्णयाचा लाभ सरकारी आरोग्य सेवेवर अवलंबून असलेल्या लाखो आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना होईल. उपचारांच्या यादीत वाढ केल्यामुळे आता शस्त्रक्रियादेखील कोणत्याही आर्थिक बोजाशिवाय उपलब्ध होतील. एकूण २,३९९ उपचारांपैकी २२३ उपचार केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव असतील. आता यात ‘राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण’चे मूळ दर आणि महाराष्ट्राने मंजूर केलेले उपचार खर्च लागू केले जातील. रुग्णालये त्यांच्या कामगिरीवर आधारित प्रोत्साहनासाठी पात्र असतील. उपचारांचा समावेश आणि त्यांचे दर यांबाबतचे सर्व धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नियामक परिषदेला देण्यात आले आहेत. विस्तारित २,३९९ उपचारांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाईल आणि त्यांच्या वेळोवेळी आढावा घेतला जाईल.
मुख्य म्हणजे आतापर्यंत या योजनेत रुग्णालयात दाखल राहून उपचार घेत असलेल्या रुग्णांना मोफत उपचार मिळत होते. मात्र, आता ही योजना बाह्यरुग्ण विभागाची सेवा पुरविणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्वच उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लागू करण्यात आली आहे. राज्यात सध्या शहरी व ग्रामीण भागात मिळून दोन हजार ६०० हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १० हजारांहून अधिक आरोग्य उप केंद्रे असून, ही सर्व केंद्रे योजनेंतर्गत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सध्या योजनेत १,३०० उपचारांचा समावेश आहे. येत्या आठवड्यात हा आकडा वाढवून २,३९९ पर्यंत नेण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्व महापालिका, जिल्हा परिषद, त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व आरोग्य केंद्र आणि शहरी आरोग्य केंद्र यांचा याअंतर्गत समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले.

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी करावी?
योजनेसंदर्भातील माहितीसाठी https://www.jeevandayee.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या
तिथे आपली माहिती भरून लॉग इन करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवा फॉर्म उघडेल.
त्या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा आणि स्कॅन करत कागदपत्रे सबमिट करा.
अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी नोंदणी करून लाभ मिळवू शकता.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.