सरकारी कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांना अनेकदा चांगले अनुभव येत नाहीत. अधिकारी-कर्मचारी बराच वेळ जागेवर नसणे, योग्य उत्तरे न मिळणे, आवश्यक कागदपत्रांसाठीचा विलंब, उडवाउडवीची उत्तरे मिळणे, कार्यालयातील अस्वच्छता, बसण्यासाठी जागा, पिण्याचे पाणी नसणे, असे अनेक अनुभव येत असतात. याबाबत कार्यालयांमध्ये काही
वर्षांपासून सुचना पेटी किंवा तक्रार पेटी ठेवण्याची पध्दत अस्तित्वात आहे.
पण त्याकडे कुणाचेही लक्ष नसते, अशी सध्याची स्थिती आहे. आता फडणवीस
सरकारने त्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.
सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पूर्वी तक्रार किंवा सुचना पेटीचे स्वरूप तक्रारीपुरते मर्यादीत आहे. त्याचा प्रशासकीय सुधारणांच्या दृष्टीकोणातून पुनरिक्षण व पुनरावलोकन करण्याच्या व कार्यालयाच्या कामकाजाबाबत सुधारणेच्या दृष्टीने योग्य तो उपयोग होत नाही. शासनाच्या विविध विभागांमार्फत व शासकीय कार्यालयांमार्फत नागरिकांना अनेक सेवा पुरविल्या जातात. या प्रक्रियेमध्ये नागरिकांना येणाऱ्या अडचणी, मिळणारी मदत, कार्यालयीन वातावरण, अधिकारी व कर्मचारी यांची वर्तणूक, कामकाजातील सुलभता किंवा विलंब याबाबतचा त्यांचा अनुभव प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.
नागरिकांच्या अनुभवांच्या आधारे शासकीय कामकाजाचे परीक्षण झाल्यास प्रशासनाला आत्मपरीक्षणाची संधी मिळून सुधारणा आवश्यक असलेलो क्षेत्र स्पष्टपणे समोर येतील. याअनुषंगाने राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता व सुशासन या संकल्पनेच्या अनुषंगाने नागरिकांकडून त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे अभिप्राय प्राप्त करून घेण्यात येणार आहेत.त्यानुसार प्रत्येक कार्यालयामध्ये पाच मुद्द्यांचा समावेश असलेला फॉर्म उपलब्ध करून दिला जाणार आहे. हे अभिप्राय फॉर्म अभिप्राय पेटी जवळच उपलब्ध असेल. तसेच याशिवाय सुद्धा कुणाला स्वतः कागदावर लिहून काही अभिप्राय द्यावयाचे असल्यास त्यास फॉर्मचे बंधन नसेल. शासकीय कार्यालयास भेट देणाऱ्या नागरिकांना हा अभिप्राय सादर करण्यासाठी कार्यालयाच्या दर्शनी ठिकाणी कुलूपबंद अभिप्राय पेटी ठेवण्यात आली असेल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.अभिप्राय फॉर्ममध्ये नागरिकांना कार्यालयीन स्वच्छता, सेवा देण्याची पद्धत, नागरिकांशी वागणूक, कामकाजातील सुलभता, या मुद्द्यांवर १ ते ५ इतके गुणांकण करता येईल. तसेच त्यांना आलेल्या अनुभवांवर मुक्त स्वरूपात त्यांचे अभिप्राय नोंदवून सदर अभिप्राय कुलूपबंद पेटीमध्ये टाकता येतील. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांबरोबरच अधिकारी व कर्मचारी सुद्धा शासन अधिकाधिक लोकाभिमुख कसे होऊ शकेल तसेच विकासात्मक व प्रशासकीय दृष्टीने शासकीय योजनांमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत याबाबत आपले अभिप्राय या यंत्रणेद्वारे देऊ शकतील, असेही नमूद करण्यात आले आहे.
अभिप्राय
पेटी दरमहा ५ तारखेला किंवा त्यादिवशी शासकीय सुट्टी असल्यास पुढील
कार्यालयीन दिनांकास कार्यालय प्रमुख किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या
अधिकाऱ्याच्या उपस्थितीत उघडण्यात यावी, शक्य असल्यास कर्मचारी तसेच
उपस्थित नागरिकांच्या साक्षीने पारदर्शकपणे करण्यात यावी. अभिप्राय
पेटीमधून प्राप्त झालेल्या सर्व सूचनांचे व अभिप्रायांचे वाचन करून त्यांचे
संकलन करण्यात यावे व त्यांचे स्वरूप व आशय यानुसार परीक्षण करण्यात यावे.
त्यानुसार आवश्यकतेनुसार पुढील निर्णय घ्यावेत, असेही स्पष्ट करण्यात आले
आहे.
असे आहेत पाच मुद्दे -
१. कार्यालयीन स्वच्छता व अभ्यागतासाठीच्या इतर सुविधा२. समस्या सोडविण्यात मिळालेली मदत३. अधिकारी कर्मचारी यांची वर्तणुक४. कार्यालयातील एकंदरीत अनुभव५. या शासकीय कार्यालयातर्फे राबविल्या जाणाऱ्या योजना, अधिनियम तसेच आस्थापना विषयक अभिप्राय
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.