राज्य सरकारचा मोठा निर्णय! मार्चपासून कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव भत्ता; लाखों कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार आता जादा रक्कम
पुणे: राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र (DA Hike ) कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 7 व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून तो 55 टक्क्यांवरून 58 टक्के करण्यात आला आहे. ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू राहणार आहे. या निर्णयानुसार 1
फेब्रुवारी 2026 पासून वाढीव महागाई भत्ता रोखीने देण्यात येणार आहे. जुलै
2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 मध्ये रोखीने अदा
केली जाणार आहे. उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश जारी करण्यात
येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
महागाई भत्ता देण्यासंदर्भातील विद्यमान नियम आणि कार्यपद्धती पुढेही कायम राहणार आहेत. या वाढीमुळे होणारा खर्च संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकले जातात, त्याच मंजूर अनुदानातून भागवण्यात येणार आहे. अनुदानप्राप्त संस्था आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही संबंधित उपलेखाशीर्षाखाली हा खर्च नोंदवण्यात येईल.महागाई भत्ता वाढीचा हा निर्णय राज्यातील लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णय क्रमांक मभवा-1325/प्र.क्र.19/सेवा-9 अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला असून तो [www.maharashtra.gov.in](https://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हा आदेश राज्यपालांच्या आदेशानुसार वित्त विभागाकडून डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला आहे. मार्च 2026 पासून प्रत्यक्ष रोखीचा लाभ मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ दिसून येणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.