Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कृष्णामाईच्या काठी साजरा झाला मानवतेचा महोत्सवमहाराष्ट्राचा ५९ व्या निरंकारी संत समागमाने दूरवर पसरवला भक्तीचा सुगंध समापन सेवेतून:, ‘सेवा हीच भक्ती’चा कृतिशील संदेश

कृष्णामाईच्या काठी साजरा झाला मानवतेचा महोत्सव
महाराष्ट्राचा ५९ व्या निरंकारी संत समागमाने दूरवर पसरवला भक्तीचा सुगंध
समापन सेवेतून ‘सेवा हीच भक्ती’चा कृतिशील संदेश

सांगली, दि. 11 फेब्रुवारी 2026 :
कृष्णा नदीच्या पावन तीरावर सांगलीवाडी (सांगली) येथील सुमारे ३५० एकराच्या विशाल प्रांगणात महाराष्ट्राचा ५९ वा निरंकारी संत समागम अत्यंत भक्तिभाव, प्रेमभाव आणि मानवतेच्या दिव्य संदेशाने संपन्न झाला. ‘आत्ममंथन’ ही या भव्य आध्यात्मिक सोहळ्याची मुख्य  थीम होती. व्यक्तीने स्वतःकडे अंतर्मुख होऊन मानवी मूल्यांचे आत्मपरीक्षण करावे, हा त्यामागील मुख्य उद्देश होता.

२४ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत झालेल्या या चारदिवसीय समागमासाठी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. विविध भाषा, संस्कृती व प्रदेशांतून आलेले भक्त निरंकार परमेश्वराच्या स्मरणात एकरूप झाले होते.त्याचबरोबर निरंकारी साधे विवाह पध्दतीने ८२ जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न झाला. संपूर्ण परिसर अभंग, भजन, विचार प्रवचन आणि नामघोषाने भक्तिरसात न्हालेला दिसून येत होता. आजही या कृष्णाकाठच्या काळ्या मातीच्या कणाकणात भक्ती ज्ञान प्रेमाचा सुगंध दरवळतो आहे. नव्हे नव्हे तर मनामनातून सर्वदूर नांदत आहे.
      
निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य संदेशानुसार मानवता, एकता, समानता व विश्वबंधुत्व या मूल्यांची अनुभूती या समागमात प्रत्येक क्षणी  मिळत होती. ‘संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे’ या भावनेतून ‘आत्ममंथन’ या विषयाद्वारे प्रत्येक भक्ताला स्वतःच्या आचार, विचार व व्यवहारात सकारात्मक बदल घडविण्याचा संदेश देण्यात आला.
समागमाच्या मुख्य कार्यक्रमांची सांगता झाल्यानंतरही सेवाभावाची ज्योत अखंड तेवत राहिली. समापन सेवेदरम्यान सांगली व सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र परिसरातील निरंकारी सेवादल व भक्तांनी समागम स्थळी उभारण्यात आलेले मंडप, कार्यालये यांचे नियोजनबद्ध समापन तसेच संपूर्ण परिसराची स्वच्छता अत्यंत आत्मीयतेने केली. ही सेवा केवळ श्रमदान न राहता, सेवा ही एक श्रेष्ठ भक्ती असल्याची प्रेरणादायी अनुभूती ठरली.
“कार्य संपले, पण सेवा संपली नाही” हा संदेश देणारी ही समापन सेवा निरंकारी मिशनच्या ‘मानवतेची सेवा हीच खरी ईश्वरपूजा’ या शिकवणीचे जिवंत दर्शन घडवणारी ठरली.
अशा प्रकारे कृष्णामाईच्या साक्षीने ‘आत्ममंथन’ या संकल्पनेवर आधारित संपन्न झालेला हा निरंकारी संत समागम केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता मानवता, अध्यात्म आणि विश्वबंधुत्वाचा अविस्मरणीय महोत्सव ठरला असून, या पावन सोहळ्यातून मिळालेली प्रेरणा भाविकांच्या जीवनात सदैव प्रकाशमान राहणार आहे.अशी माहिती सातारा सांगली झोनचे झोनल इन्चार्ज श्री नंदकुमार जी झांबरे यांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.