Breaking News!बारावीच्या पहिल्याच पेपरला सामूहिक कॉपी; मदत करणारे मास्तरही CCTVमध्ये कैद, 19 जणांवर कारवाई
छत्रपती संभाजीनगर: बारावी परीक्षेत विद्यार्थी चक्क एकमेकांच्या उत्तरपत्रिका पाहून लिहित होते आणि हे सर्व केंद्रांवरील शिक्षकांच्या सहकार्याने सुरू होते. सामूहिक कॉपीचा हा धक्कादायक प्रकार पहिल्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय केंद्रावर समोर आला.
सामूहिक कॉपीचा सर्व प्रकार 'सीसीटीव्ही'मध्ये कैद झाला. आता शिक्षण विभागाकडून केंद्रसंचालकासह १९ जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यासह जालन्यातही कॉपी प्रकरणी एकाच पथकाकडून सहा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यांतून ४५४ परीक्षा केंद्रावरुन एक लाख ९० हजार ५९२ तर लातूर विभागातील तीन जिल्ह्यातील २५३ परीक्षा केंद्रावरुन ९६ हजार ४९६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर, विस्तार अधिकारी सिताराम पवार यांच्या भरारी पथकाने राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय केंद्राला भेट दिली. परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांकडून नक्कल होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, परीक्षा केंद्रावर उपलब्ध 'सीसीटीव्ही'च्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या उत्तरपत्रिकांकडे पाहून गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले. त्यासह एका बाकावर दोन विद्यार्थी तर काही विद्यार्थी उभे राहूनही उत्तरे लिहत होती. हे सर्वकाही शिक्षकांच्या सहकार्याने सुरू असल्याचे आढळले. शिक्षकच सामूहिक कॉपी प्रकरणात सहभागी लक्षात येताच 'सीसीटीव्ही' फुटेज शिक्षण विभागाने ताब्यात घेतले. आणि कारवाईची प्रक्रिया सुरू केली. केंद्र संचालकांसह तब्बल १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
सर्वांत मोठी कारवाई
जिल्ह्यातील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय केंद्रांवर इयत्ता १२ वीच्या इंग्रजी पेपर परीक्षेदरम्यान आढळून आलेल्या गैरप्रकाराच्या प्रकरणात दक्षता समितीच्या आदेशानुसार कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्ह्यातील आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या परीक्षा-संबंधित कारवायांपैकी एक मानली जात आहे.
बैठे पथकावरही कारवाई..!
या प्रकरणात परीक्षा केंद्र संचालकासह एकूण १९ जणांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या पर्यवेक्षक शिक्षक व बैठे पथकातील अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाचे प्रस्ताव दाखल करण्यात आला. तसेच, इतर संस्थांशी संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात त्यांच्या संस्थेमार्फत संस्थांतर्गत शिस्तभंगात्मक कार्यवाही करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, असे अधिकारीसूत्रांनी सांगितले.
तात्काळ अदलाबदल
परीक्षा केंद्रावरील प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, शिक्षण विभागाने तात्काळ निर्णय घेत या परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलला. केंद्र प्रमुखांसह १४ व दोन सहाय्यक असे १७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पुढील सर्व पेपर शिस्तीत व नियमानुसार पार पडाव्यात यासाठी नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांना करण्यात आल्याचे आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
३३४ विद्यार्थी
संबंधित परीक्षा केंद्रावर १४ परीक्षा दालन आहेत. परीक्षा केंद्रांवर ३३४ परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. त्यात इंग्रजीच्या विषयाच्या पेपरला ३२७ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तर सात विद्यार्थी गैरहजर होते, असे अधिकारीसूत्रांनी सांगितले.
परीक्षा केंद्रांवर भेट दिल्यानंतर कॉपीचा प्रकार लक्षात आला. 'सीसीटीव्ही' फुटेजची सखोल सखोल तपासणी केल्यानंतर सर्व प्रकार लक्षात आला. यानंतर तात्काळ कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. -अश्विनी लाठकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, छत्रपती संभाजीनगर
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.