Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्मार्ट मीटरबाबत मोठी बातमी. भाजप सत्तेवर असलेली तीन राज्ये मीटर बसवण्यात आघाडीवर. महाराष्ट्रात.

स्मार्ट मीटरबाबत मोठी बातमी. भाजप सत्तेवर असलेली तीन राज्ये मीटर बसवण्यात आघाडीवर. महाराष्ट्रात.
 
 
नागपूर : 'स्मार्ट प्रीपेड मीटर'ला आजही अनेक ग्राहक तसेच संघटनांचा विरोध आहे. त्यानंतरही देशातील अनेक राज्यांत हे मीटर स्मार्ट मीटरच्या नावावर बसवले जात आहेत. भाजप सत्तेवर असलेल्या उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र ही तिन्ही राज्ये स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात आघाडीवर आहेत.

या राज्यांत किती मीटर बसवले गेले? या मीटरचे परिणाम काय ? याबाबत आपण जाणून घेऊया. महाराष्ट्रात १० फेब्रुवारीपर्यंत ८७.५७ लाख स्मार्ट मीटर बसवले गेले. तर बिहारमध्ये ८६.४४ लाख आणि उत्तर प्रदेशात ८२.७५ लाख मीटर बसवण्यात आले. त्यामुळे मीटर बसवण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. विजेचा वापर कोणत्या वेळेला झाला यानुसार वीजदरात सवलत देण्याच्या पद्धतीला 'टाईम ऑफ डे' (टीओडी) सवलत म्हणतात. स्मार्ट मीटरमध्ये वेळेनुसार वीजवापर मोजण्याची सुविधा आहे. या मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या भ्रमणध्वनीवरील ॲपद्वारे दर तासाला घरात किंवा कार्यालयात किती वीज वापर होत आहे, हे कळते. या मीटरमुळे घरगुती ग्राहकांसाठीही टीओडी सवलत सुरू केली गेली आहे.
 
महाराष्ट्रातील स्मार्ट मीटर बसवलेल्या ५४.४२ लाख घरगुती ग्राहकांना जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत मासिक वीजबिलांमध्ये तब्बल ५१ कोटी ४२ लाख रुपयांचा लाभ झाला. तर या कालावधीत लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक ग्राहकांना १०६.८९ कोटी रुपये, वाणिज्यिक ग्राहकांना ४३ कोटी रुपये, सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी ७.३० कोटी रुपये आणि इतर ग्राहकांना ६.७० कोटी रुपयांचा टीओडी सवलतीचा लाभ मिळाला. या सर्व गटांचा एकूण लाभ २१५.३५ कोटी रुपये इतका आहे. उच्चदाब ग्राहकांना याच कालावधीत दिवसभरातील वीजवापरावर १,३४९ कोटी रुपयांचा टीओडी लाभ मिळाला असून त्यापैकी औद्योगिक ग्राहकांचा वाटा १,१०५ कोटी रुपये आहे, अशी माहिती महावितरणने दिली.
महावितरण म्हणते देयकांच्या तक्रारी अर्ध्या टक्क्यावर

स्मार्ट मीटरच्या बाबतीत वीजवापराची नोंद स्वयंचलित पद्धतीने केली जाते. त्यामुळे ग्राहकांना वीजवापराचे अचूक बिल मिळते. राज्यात स्मार्ट मीटरचा वापर वाढत असून त्यासोबत देयकांबाबतच्या तक्रारीही कमी होत आहेत. सध्या देयकांच्या तक्रारींचे प्रमाण अर्ध्या टक्क्यांपर्यंत आले आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढते, या तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.

२.८० लाख वितरण रोहित्रांवर स्मार्ट मीटर
राज्यातील सर्व विद्युत फीडरवर स्मार्ट मीटर बसवण्यात आले असून त्यांची संख्या ३०,१६४ इतकी आहे. तसेच राज्यातील २.८० लाख वितरण रोहित्रांवरही स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे वीज वितरण प्रणालीतील विजेचा अचूक वापर समजण्यास मदत होत आहे. याच्या आधारे वीज वितरण व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येत असून वीजगळती रोखणे आणि परिणामकारक ऊर्जा लेखापरीक्षण करणे सुलभ होत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.