पाच वर्षांपूर्वी ज्या 'खतरनाक' टेक्नॉलॉजीला जगाने थांबवलं; त्यालाच चष्म्यात लपवून आणत आहे मेटा? अनोळखी लोकांनाही कळेल तुमच नावंं
मेटा कंपनी पुन्हा एकदा वादा भोवऱ्यात अडकली आहे. पाच वर्षांपूर्वी गोपनीयतेच्या मुद्द्यांमुळे बंद केलेले फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान आता रे-बॅन स्मार्ट चष्म्यात आणण्याची तयारी कंपनी करत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार
अंतर्गत 'नेम टॅग' या नावाने ओळखले जाणारे हे फीचर यंदाच लॉन्च होऊ शकते.
यामुळे चष्मा घातलेल्या व्यक्तीला समोरची अनोळखी माणसे फक्त चेहरा पाहून
ओळखता येईल आणि मेटाच्या एआय असिस्टंटद्वारे त्यांची माहिती नाव, सोशल
मीडिया प्रोफाइल किंवा इतर सार्वजनिक डेटा लगेच समोर येईल.
२०२१ मध्ये मेटाने (तेव्हा फेसबुक) जवळपास एक अब्ज लोकांचा फेस स्कॅन डेटा हटवला होता. गोपनीयता कार्यकर्ते आणि कायद्याच्या दबावामुळे हे तंत्रज्ञान बंद करण्यात आले. मात्र रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लासेसच्या प्रचंड यशाने कंपनीला हे पुन्हा सुरू करण्यास प्रवृत्त केले. हे चष्मे आधीच कॅमेरा, एआय आणि व्हॉइस कमांडसह येतात; आता 'नेम टॅग' जोडल्यास ते आणखी पावरफुल होईल.गोपनीयता तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मोबाइलवर फेशियल रेकग्निशन अजून सहन करता येईल पण घालण्यायोग्य चष्म्यात हे तंत्रज्ञान पूर्ण सिक्रेसी नष्ट करेल. रस्त्यावर चालताना एखाद्याने तुमचा चेहरा स्कॅन केला तर तुमचे नाव, नोकरी, सोशल मीडिया किंवा इतर माहिती त्यांना कळू शकेल. हे साय-फाय चित्रपटासारखे वाटत असले तरी वास्तव होण्याच्या मार्गावर आहे.मेटा मात्र सावध आहे. कंपनीने अंतर्गत मेमोमध्ये म्हटले आहे की, सध्याच्या 'डायनॅमिक पॉलिटिकल एन्व्हायर्नमेंट'मध्ये (अमेरिकेतील राजकीय गोंधळ) गोपनीयता संघटना इतर मुद्द्यांमध्ये गुंतलेल्या असतील त्यामुळे विरोध कमी होईल. सुरुवातीला हे फीचर दृष्टिहीन किंवा विशेष गरज असलेल्यांसाठी मदत म्हणून सादर केले जाऊ शकते जेणेकरून त्याची उपयुक्तता दाखवता येईल.२०२४ मध्ये हार्वर्डच्या दोन विद्यार्थ्यांनी रे-बॅन ग्लासेसमध्ये फेशियल रेकग्निशन जोडून अनोळखी लोकांची माहिती (पत्ता, फोन नंबर) काढली होती, ज्याने गोपनीयतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. मेटा म्हणते की, हे फीचर फक्त मेटा प्लॅटफॉर्मवरील कनेक्शन किंवा सार्वजनिक इंस्टाग्राम अकाउंट्सपुरते मर्यादित असेल सर्वसाधारण लोकांना स्कॅन करणार नाही. तरीही तज्ञांचे म्हणणे आहे की हे तंत्रज्ञान एकदा आले की दुरुपयोग होण्याची शक्यता खूप आहे. मेटाच्या या निर्णयाने तंत्रज्ञान आणि गोपनीयतेच्या सीमारेषेवर नवीन वाद निर्माण झाला आहे. भविष्यात चेहरा पाहूनच 'hi , तू कोण?' असा प्रश्न विचारावा लागणार नाही, पण त्यासाठी आपली गोपनीयता किती किंमत मोजावी लागेल? हे पाहणे आता बाकी आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.