Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"भोगा आपल्या कर्माची फळं", खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट निघाल्यानंतर अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत

"भोगा आपल्या कर्माची फळं", खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट निघाल्यानंतर अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरधात भोसरी जमीन खरेदी प्रकरणी सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. शुक्रवारी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने न्यायालयाने सदरचा कठर निर्णय घेतला आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजदली दमानिया यांनी टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक्स पोस्ट केली आहे. 
 
विशेष पीएमएलए न्यायालयाने या प्रकरणात एकनाथ खडसे यांनी दाखल केलेला दोषमुक्तीचा अर्ज यापूर्वी फेटाळला होता. त्यामुळे या प्रकरणातील खडसे कुटुंबियांच्या कायदेशीर अडचणी आणखी वाढल्या होत्या. त्यानंतरही सुनावणीसाठी न्यायालयात हजर न राहिल्याने सत्र न्यायालयाने खडसे दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याचे आदेश दिले आहेत.

भोगा आपल्या कर्माची फळं
यावरून अंजली दमानिया यांनी त्यांना दिलेल्या त्रासाबद्दल एक्स पोस्ट केली आहे. त्या म्हणाल्या, '२०१६ साली खडसेंनी माझ्यावर तब्बल ३२ बदनामीचे खटले सहा जिल्ह्यांत केले. एकाच वेळी सगळ्या कोर्टांत हजर राहणं मानवीदृष्ट्या अशक्य होतं. केवळ तारीख चुकली म्हणून माझ्यावर Non-Bailable Warrant काढून दहशत निर्माण केली गेली. त्या काळात मानसिक छळ आणि न्यायव्यवस्थेचा गैरवापर मी शांतपणे सहन केला. आज, वर्षानुवर्षांच्या संघर्षानंतर, त्यातले बहुतांश खटले संपुष्टात आले आहेत. आणि आता , यांच्यावरच Non-Bailable Warrant कोर्टाने काढला आहे. कुकर्मांचे फळ चुकत नाही. ह्याच जन्मात, ह्याच न्यायव्यवस्थेत, कर्मांची फळं भोगावीच लागतात. भोगा आपल्या कर्मांची फळं', असं त्यांनी म्हटलं आहे. 
 
एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसे यांच्यावर भोसरी येथील जमीन खरेदी व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी आणि सुनावणी दीर्घकाळापासून सुरू असून, न्यायालयीन प्रक्रियेत आता हा टप्पा खडसे दाम्पत्यासाठी अधिक अडचणीचा ठरणार आहे. अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यामुळे त्यांना न्यायालयासमोर हजर राहणे अनिवार्य झाले आहे. या प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आमदार एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरोधात मनी लॉन्डरिंगच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केले आहे. सुमारे एक हजार पानांचे हे आरोपपत्र असून, त्यात खडसे कुटुंबीयांसह तीन खासगी कंपन्यांचाही समावेश करण्यात आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.