Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या सर्वात रोमांचक लढतीत शिवसेनेने उडवला भाजपचा धुव्वा! गोपीचंद पडळकरांना 'जोर का झटका'

सांगलीच्या सर्वात रोमांचक लढतीत शिवसेनेने उडवला भाजपचा धुव्वा! गोपीचंद पडळकरांना 'जोर का झटका'

सांगली जिल्ह्याच्या खानापूर-विटा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विरोधकांचा धुव्वा उडवत खानापूरमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे.

या विजयामुळे तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व 4 जागांवर आणि पंचायत समितीच्या सर्व 8 जागांवर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, नागेवाडी जिल्हा परिषद गटातून आमदार सुहास बाबर यांच्या वहिनी डॉ. शीतल बाबर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला. या विजयाने तालुक्यात 'बाबर' गटाची पकड किती मजबूत आहे, हे अधोरेखित केले आहे.

ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची झाली होती, कारण आमदार सुहास बाबर यांच्या विरोधात भाजपचे वैभव पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठी ताकद लावली होती. महायुतीमधीलच या दोन प्रमुख नेत्यांमध्ये झालेला हा संघर्ष तालुक्यात चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, मतदारांनी सुहास बाबर यांच्या कामावर विश्वास ठेवत भाजपला पूर्णपणे नाकारल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. आटपाडी निंबवडे गटात जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहिनी माधवी पडळकर (भाजप) विरुद्ध अॅड. विद्या मोटे (शिवसेना शिंदे गट) यांच्यात मेन फाईट होती.

भाजपला या निवडणुकीत 'व्हाईट वॉश' मिळाल्यानंतर आमदार सुहास बाबर यांनी विटा शहरात शड्डू ठोकून विजयाचा जल्लोष केला. आपल्या विजयाबद्दल बोलताना त्यांनी हा विजय सर्वसामान्य जनतेचा आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाचा असल्याचे सांगितले. विरोधकांनी कितीही युती केली तरी खानापूरच्या मातीतील जनता शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभी आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

खानापूरमधील या एकतर्फी निकालामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सुहास बाबर यांचे वजन वाढले आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर भगवा फडकल्यानंतर आता तालुक्याच्या विकासाला अधिक वेग येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या विजयाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देखील शिवसेनेने आपली दावेदारी अधिक प्रबळ केली असल्याचे मानले जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.