सांगली :- १७ वर्षापूर्वी घरातून अचानक बेपत्ता झालेला वसईचा 'संतोष' अखेर मिरजेतील शासकीय रुग्णालयात सापडला
सांगली: वसईच्या गावराईपाड्यात पानटपरी चालविणारे संतोष दामोदर पाटील २००९ मध्ये अचानक बेपत्ता झाले. तब्बल १७ वर्षे कुटुंबीयांनी त्यांचा दाहीदिशा त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. ते मरण पावले असावेत, अशी शंकाही व्यक्त
होत राहिली; पण काळाची चक्रे फिरली व मिरजेच्या शासकीय रुग्णालयाने
त्यांची नातेवाइकांशी गाठभेट घालून दिली. १३ जानेवारी रोजी मिरजेत
कृष्णाघाटमध्ये वाहनाच्या धडकेत जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले होते.
प्रशासन व समाजसेवा अधीक्षक सूर्यप्रकाश राऊत यांनी त्यांची जबाबदारी
घेतली. पण तो असंबद्ध बडबडत होता. अखेर दोन दिवसांपूर्वी त्याने आपले नाव
संतोष पाटील असून, वसईचा राहणारा असल्याची त्रोटक माहिती दिली. राऊत यांनी
ही माहिती वसईमध्ये मित्रांना पाठविली. ती माहिती नगरसेवक गणेश पाटील
यांच्यापर्यंत पोहोचली. योगायोगाने संतोष हे गणेश यांचे चुलतभाऊ असल्याचे
स्पष्ट झाले. त्यांनी राऊत यांच्याशी संपर्क साधला. व्हिडिओ कॉलद्वारे
भावाशी बोलणे केले. शनिवारी संतोष यांची पत्नी मंदा, मुलगा हर्षदसह मिरजेत
दाखल झाले. संतोष यांना वसईत आणले. तसेच संतोष यांच्यावर योग्य उपचाराबद्दल
रुग्णालय प्रशासनाला धन्यवाद दिले.
परतण्याची आशा नव्हती
२००७ मध्ये संतोष यांच्या मोठ्या भावाचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर मानसिकदृष्ट्या बेचैन अवस्थेत त्यांनी घर सोडले. कुटुंबीयांनी त्यांच्या शोधासाठी अर्धा महाराष्ट्र पालथा घातला. हळूहळू त्यांचा विसरही पडत गेला. पत्नी मंदा मात्र पतीच्या परतण्यावर विश्वास ठेवून होत्या. मुलगा हर्षद हा वडील बेपत्ता झाले तेव्हा सात-आठ वर्षांचा होता. त्याने कळत्या वयात काल प्रथमच वडिलांना पाहिले. दरम्यान, संतोष कोठे गेले, कोठे फिरले याची माहिती ते सांगू शकत नाहीत. मी नुकतीच पालिका निवडणूक जिंकलो आहे. त्यामुळे खंडोबा मंदिरात जागर व गोंधळाचा कार्यक्रम ठेवला होता. कार्यक्रमावेळीच संतोषविषयी माहिती मिळाली. तो पुन्हा घरी परतल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला आहे, असे वसई-विरार पालिकेचे नगरसेवक गणेश पाटील म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.