महाराष्ट्रात कॅन्सरवर मोफत उपचार कसे मिळवाल? सरकारी योजनांचा लाभ घेण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे?
केमोथेरपी, रेडिओथेरपी, शस्त्रक्रिया आणि दीर्घकालीन फॉलोअप हे शब्द ऐकताच अनेक कुटुंबांच्या मनात भीतीपेक्षा आधी खर्चाचा विचार येतो. भारतात कर्करोगावरील उपचार हे वैद्यकीयदृष्ट्या जितके गुंतागुंतीचे, तितकेच आर्थिकदृष्ट्याही अडचणीचे मानले जातात. एका मध्यमवर्गीय किंवा ग्रामीण कुटुंबासाठी कर्करोगाचे निदान म्हणजे केवळ आजार नाही, तर आयुष्यभराची आर्थिक घडी विस्कटणारा प्रसंग असतो. मात्र या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत एक महत्त्वाची पण कमी चर्चेत असलेली घडामोड घडली.
राज्यात शासकीय, निमशासकीय आणि सार्वजनिक हिताच्या योजनांच्या माध्यमातून मोफत किंवा अत्यंत सवलतीचे कर्करोग उपचार प्रत्यक्षात उपलब्ध आहेत. यात मुख्य अडचण एकच आहे, या योजनांची माहिती विखुरलेली आहे, प्रक्रिया गुंतागुंतीची आहे आणि योग्य मार्गदर्शनाअभावी अनेक रुग्ण या सुविधांपर्यंत पोहोचतच नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर कोणते पर्याय उपलब्ध आहेत, कोणासाठी आहेत, त्यांचा प्रत्यक्ष लाभ कसा घेता येतो आणि कुठे अडथळे येतात याचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे.
१) टाटा मेमोरियल सेंटर : सवलतीच्या दरात किंवा मोफत उपचार देणारी देशातील अग्रगण्य संस्था
मुंबईतील परळ येथे असलेले Tata Memorial Centre (TMC) हे केवळ एक रुग्णालय नाही, तर भारतातील कर्करोग उपचार, संशोधन आणि सार्वजनिक आरोग्य धोरणांचा कणा मानले जाते. परळमधील मुख्य रुग्णालयाबरोबरच खारघर येथील होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरमध्येही दरवर्षी लाखो हजारो रुग्णांवर उपचार केले जातात. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून ते देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येथे उपचारासाठी येतात.
मोफत किंवा मोठ्या प्रमाणात सवलतीत उपचार कसे मिळतात?
टाटा मेमोरियलमधील General Category ही संकल्पना खासगी रुग्णालयांच्या चौकटीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. खासगी उपचार परवडत नसलेल्या रुग्णांना येथे जनरल विभागात नोंदणी करता येते. रुग्णाची आर्थिक स्थिती, उत्पन्नाचे दाखले आणि शिधापत्रिकेच्या आधारे; सल्लामसलत, तपासण्या, केमोथेरपी, काही प्रमाणात औषधे हे उपचार अत्यंत सवलतीच्या दरात किंवा पूर्णतः मोफत दिले जातात. दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांसाठी ही व्यवस्था अक्षरशः जीवनरक्षक ठरते.
बालकर्करोगासाठी स्वतंत्र आर्थिक आधार
२०२५
च्या सुरुवातीला टाटा मेमोरियलने बालकर्करोग उपचारांसाठी ६० कोटींहून अधिक
निधी उभारल्याची घोषणा केली. हा निधी केवळ उपचारापुरता मर्यादित नाही, तर
तो पुढील बाबींसाठीही वापरला जातो.
दीर्घकालीन फॉलो-अप
उपचारानंतरचे पुनर्वसन
औषधोपचारातील सातत्य
बालकर्करोगाच्या बाबतीत उपचार अर्धवट थांबणे म्हणजे पुन्हा आजार बळावण्याचा धोका असतो, हा निधी तो धोका कमी करतो.
वास्तववादी अडचणी
इथे एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही. रुग्णसंख्या प्रचंड असल्यामुळे; अपॉइंटमेंटसाठी प्रतीक्षा, तपासण्यांमधील अंतर, फॉलो-अपसाठी वेळ लागतो. त्यामुळे टाटा मेमोरियल म्हणजे तत्काळ उपचार नव्हे, तर सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, याची मानसिक तयारी रुग्ण आणि नातेवाईकांना ठेवावी लागते.
२) कर्करोगासाठी शासकीय विमा संरक्षण : MJPJAY आणि PM-JAY
महाराष्ट्र
शासनाची Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana ही योजना कर्करोग
उपचारांच्या खर्चावर नियंत्रण आणण्याचा सर्वात मोठा प्रयत्न मानला जातो. ही
योजना केंद्र सरकारच्या Ayushman Bharat-PM-JAY चौकटीशी संलग्न आहे. या
योजनेंतर्गत एका कुटुंबाला दरवर्षी सुमारे १.५ लाखांपर्यंत कॅशलेस उपचार
कव्हर मिळू शकतं. (महाराष्ट्र सरकारने २०२३-२४ च्या धोरणानुसार हे संरक्षण
आता ५ लाख रुपये प्रति कुटुंब प्रति वर्ष इतके वाढवले आहे.)
कोण पात्र ठरते?
पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका, अंत्योदय किंवा अन्नपूर्णा कार्ड असलेले महाराष्ट्रातील रहिवासी या योजनेत प्राधान्याने येतात. SECC डेटावर आधारित पात्रताही महत्त्वाची ठरते. (आता ही योजना महाराष्ट्रातील सर्व रेशनकार्डधारक (पांढरे कार्डदेखील) कुटुंबांना लागू करण्याचा निर्णय झाला आहे, त्यामुळे केवळ पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका ही अट आता शिथिल झाली आहे.)
यात काय कव्हर होते?
एम्पॅनेल्ड शासकीय किंवा खासगी रुग्णालयांमध्ये;
रुग्णालयात भरती
शस्त्रक्रिया
निदानात्मक तपासण्या
केमोथेरपी / रेडिओथेरपी
शासकीय मान्यता असलेल्या रुग्णालयात हे सगळे उपचार कॅशलेस पद्धतीने मिळू शकतात.
३) गंभीर आजारांसाठी थेट आर्थिक मदत : RAN, SIAF आणि आरोग्यमंत्र्यांचा निधी
काही वेळा विमा योजना अपुरी ठरते किंवा लागूच होत नाही. अशा वेळी राष्ट्रीय आरोग्य निधी (RAN) अंतर्गत असलेल्या योजना महत्त्वाच्या ठरतात.राज्य आजार सहाय्य निधी (SIAF)दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना, शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना, कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारासाठी सुमारे १ लाखांपर्यंत थेट आर्थिक मदत मिळू शकते.
आरोग्यमंत्र्यांचा कर्करोग रुग्ण निधी
या
निधीतून पात्र रुग्णांना २ लाखांपर्यंत मदत मिळते. परंतु ती प्रामुख्याने
टाटा मेमोरियल (मुंबई) आणि RST हॉस्पिटल (नागपूर) या दोन केंद्रांपुरती
मर्यादित आहे. PM-JAY/MJPJAY अंतर्गत आधीच कव्हर असलेल्या रुग्णांना ही मदत
सहसा मिळत नाही, ही एक महत्त्वाची मर्यादा आहे.
४) जिल्हा रुग्णालयांतील मोफत केमोथेरपी:
नागपूर, पुणे, अमरावती, नाशिक, जळगाव, सातारा, वर्धा, भंडारा, गडचिरोली, अकोला अशा जिल्हा रुग्णालयांमध्ये सुरू झालेली मोफत केमोथेरपी युनिट्स ही आरोग्य व्यवस्थेतील क्रांतिकारी पावले मानली जातात. टाटा मेमोरियलच्या तज्ज्ञांकडून प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर आणि परिचारिका स्थानिक पातळीवर उपचार देतात.
याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे;
महानगरांपर्यंतचा खर्चिक प्रवास टळतो
राहण्याचा खर्च वाचतो
उपचारात सातत्य राखणे सोपे होते
विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागातील रुग्णांसाठी हा बदल निर्णायक ठरतो.
५) महाकेअर फाउंडेशन : राज्यव्यापी कर्करोग नेटवर्कची पायाभरणी
महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन (महाकेअर) ही संकल्पना म्हणजे कर्करोग उपचारांचे विकेंद्रीकरणच होय. टाटा मेमोरियलसारख्या अॅपेक्स केंद्रांपासून ते नागपूर, पुणे, नाशिक, चंद्रपूर, कोल्हापूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपर्यंत १८ रुग्णालयांचे अनेक पातळ्यांवरचे नेटवर्क उभारण्याचा हा प्रयत्न आहे.उद्दिष्ट स्पष्ट आहे; रुग्णाला घरापासून शेकडो किलोमीटर दूर न पाठवता, जवळच्या जिल्ह्यातच दर्जेदार उपचार मिळावेत.
६) मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF): तातडीच्या आर्थिक मदतीचा पर्याय
ज्या
रुग्णांचे उपचार ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’च्या (MJPJAY) कक्षेत बसत
नाहीत किंवा ज्यांचा उपचाराचा खर्च विमा मर्यादेपेक्षा जास्त आहे, अशा
रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ हा एक मोठा आधार आहे.
कोणाला लाभ मिळतो?
ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न १.६० लाख रुपयांपर्यंत आहे आणि ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, अशा रुग्णांना यातून आर्थिक मदत दिली जाते.
मदत कशी मिळते?
ही
मदत थेट रुग्णाच्या हातांत न देता, ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्या
रुग्णालयाच्या खात्यात जमा केली जाते. कर्करोगाच्या तीव्रतेनुसार यातून ५०
हजार ते २ लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य मिळू शकते.
प्रक्रिया:
यासाठी रुग्णाने किंवा नातेवाईकांनी मंत्रालयातील ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ कक्षात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागतो. अलीकडे हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने किंवा मोबाईल ॲपद्वारे सादर करण्याची सोयही उपलब्ध झाली आहे.
७) प्रत्यक्ष लाभ कसा घ्यायचा? वास्तववादी मार्गदर्शन
कागदपत्रे आणि प्रक्रिया ही सर्व योजनांमध्ये एक समान अडचण आहे. त्यामुळे;
पात्रता आधी तपासा
रुग्णालयातील सोशल वेल्फेअर कार्यालयाशी थेट संपर्क ठेवा
एम्पॅनेल्ड रुग्णालयांची खात्री करा
सर्व कागदपत्रांची छायांकित प्रत जवळ ठेवा
हे छोटे टप्पे अनेकदा उपचाराचा खर्च लाखो रुपयांनी कमी करू शकतात.
महत्त्वाच्या सूचना:
कागदपत्रे: उत्पन्नाचा दाखला डिजिटल स्वाक्षरी असलेला (Digital Signature) असावा, जुन्या किंवा हाताने लिहिलेल्या दाखल्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यास अडथळे येऊ शकतात.आरोग्यमित्र: कोणत्याही मोठ्या रुग्णालयात गेल्यावर सर्वात आधी ‘आरोग्यमित्र’ कक्षात चौकशी करा.दुसरे मत/ सल्ला (Second Opinion): टाटा मेमोरियलच्या ‘Navya’ (ऑनलाईन ओपिनियन) सेवेचा वापर करून घरबसल्या तज्ज्ञांचा सल्ला घेता येतो.औषधे: सरकारी योजनेत काही महागडी औषधे मिळत नाहीत, अशा वेळी रुग्णालयातील ‘सोशल वेल्फेअर’ फंडातून मदतीसाठी विनंती करा.योग्य वेळी अर्ज आणि बराचसा संयम महाराष्ट्रात मोफत कर्करोग उपचार ही केवळ घोषणा नाही, ती प्रत्यक्षात अस्तित्वातही आहे. पण ती स्वयंचलित नाही. योग्य माहिती, योग्य वेळी अर्ज आणि बराचसा संयम या तीन गोष्टी मिळाल्या, तर कर्करोग उपचारांचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.