Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लीलावती रुग्णालयातील त्यांचे कारनामे गंभीर, अनिल देशमुखांनी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची सगळी कुंडलीच मांडली.

लीलावती रुग्णालयातील त्यांचे कारनामे गंभीर, अनिल देशमुखांनी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची सगळी कुंडलीच मांडली.
 

मुंबई : लीलावती रुग्णालयातील ट्रस्टी आणि डॉक्टरांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बढतीच्या आमिषाने अनेक डॉक्टरांकडून प्रत्येकी २५ लाख रुपये उकळण्याचा प्रकार सुरू होता. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर जोरदार टीका केली.

या कथित गैरप्रकारांमुळे आणि गैरवर्तनामुळे रुग्णालय प्रशासनाने त्यांना पदावरून काढून टाकल्याचे देशमुखांनी नमूद केले. या घडामोडींमुळे सिंग यांच्या वागणुकीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले. मी गृहमंत्री असताना माझ्यावर खोटे आरोप करून बदनाम करण्याचे षडयंत्र ज्याने रचले, त्याच व्यक्तीचे भ्रष्ट कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत, असे देशमुख म्हणाले. मुंबईतील प्रख्यात लीलावती रुग्णालय येथे त्यांना ज्या प्रकारे पदावरून दूर करण्यात आले, त्यावरून त्यांचे वर्तन आणि चारित्र्य जनतेसमोर उघड झाले असल्याचा दावा त्यांनी केला. 
 
माजी गृहमंत्र्यांनी पुढे अँटिलिया प्रकरणाचा उल्लेख करत सांगितले की, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थान अन्टिलिया बाहेर स्फोटकासारखी वस्तू आढळल्यानंतर तपासाच्या दिशेबाबत शंका निर्माण झाल्या होत्या. त्या वेळी तत्कालीन पोलीस आयुक्त म्हणून परमबीर सिंग सरकारची दिशाभूल करत असल्याचा संशय आल्याने तपास त्यांच्या हातातून काढून दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांच्याकडे सोपवण्यात आला, असे देशमुखांनी स्पष्ट केले.

एटीएसच्या तपासातून काही गंभीर संकेत समोर आले होते, असा दावा करत देशमुख म्हणाले की, या प्रकरणात सिंग यांची भूमिका संशयास्पद वाटल्याने त्यांची कमी महत्त्वाच्या पदावर बदली करण्यात आली. पुढे शासकीय सेवेतून त्यांना दूर करण्याची कारवाईही करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. या सर्व निर्णयांचा संदर्भ त्या वेळच्या तपासातील निष्कर्षांशी जोडला गेला होता, असे देशमुखांचे म्हणणे आहे.
चांदीवाल आयोगा समोर समन्स बजावून वारंवार गैरहजर

देशमुखांनी १०० कोटी रुपयांच्या कथित आरोपांचा उल्लेख करत सांगितले की, ही कारवाई टाळण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप लावण्यात आले. आरोप होताच स्वतः चौकशीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीसमोर हजर राहण्याचे समन्स बजावूनही सिंग वारंवार गैरहजर राहिल्याचा आरोप त्यांनी केला.

लीलावती रुग्णालयातील कारनामे गंभीर
देशमुखांच्या म्हणण्यानुसार, सहा वेळा समन्स बजावूनही उपस्थित न राहिल्याने अटकेच्या भीतीने सिंग काही काळ फरार होते. शेवटी वकिलामार्फत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अनिल देशमुखांविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नाही, असे मान्य केल्याचा दावा त्यांनी केला. या घटनाक्रमामुळे १०० कोटींच्या आरोपांची विश्वासार्हता उरली नसल्याचे देशमुख म्हणाले. या पार्श्वभूमीवर लीलावती रुग्णालयातील घडामोडींचा उल्लेख करत देशमुखांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. भ्रष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याचे रुग्णालयातील कथित कारनामे गंभीर आहेत. याबाबत सत्य बाहेर यावे, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेत त्यांनी या सर्व घटनांचा परस्परसंबंध मांडत, जनतेसमोर सत्य येण्याची गरज अधोरेखित केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.