Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुलुंड मेट्रो दुर्घटना : कार्यकारी अभियंता निलंबित; एमएमआरडीएची कारवाई; पाच जणांना अटक

मुलुंड मेट्रो दुर्घटना : कार्यकारी अभियंता निलंबित; एमएमआरडीएची कारवाई; पाच जणांना अटक
 

मुंबई:  शनिवारी दुपारी मुलुंड येथील एलबीएस रोडवर मेट्रोच्या कामादरम्यान झालेल्या अपघाताप्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या चौकशी समितीच्या अहवालानंतर दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे. मात्र, त्याचवेळी प्राथमिक चौकशीनंतर महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी एमएमआरडीएच्या या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या कार्यकारी अभियंत्याला निलंबित केले आहे. तर दुसरीकडे, मुलुंड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.

मेट्रो ४ (वडाळा-ठाणे-कासारवडवली) मार्गिकेच्या कामादरम्यान झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी कंत्राटदार, सल्लागार आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कलम १०५, ११०, ३२४ (५) आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकल्प संचालक हरीश चौहान, प्रकल्प व्यवस्थापक कुलदीप सपकाळ, उपव्यवस्थापक सौरभ सिंह, पर्यवेक्षक प्रशांत भोईर आणि प्रकल्प व्यवस्थापक अवधूत इनामदार अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्यांपैकी चार जण कंत्राटदार कंपनीचे अधिकारी असून एक जण सल्लागार कंपनीतील अधिकारी आहे. पोलिसांची कारवाई सुरू असतानाच एमएमआरडीएनेही प्राथमिक चौकशीनंतर अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंते सत्यजीत साळवे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.