हौसेपोटी गाडीचा वेग वाढवणे किती महागात पडू शकते, याचा काळजाचा थरकाप उडवणारा प्रत्यय बेंगळुरूमध्ये आला आहे. एका १७ वर्षांच्या मुलाने आपल्या अल्पवयीन मित्रांसह १६० किमी प्रतितास वेगाने कार चालवत असताना भीषण अपघात घडवला. या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीच्या धडकेमुळे ट्रकचे एक्सल आणि चाके निखळून रस्त्यावर पडली.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे ४:१५ ते ४:३० च्या सुमारास डोब्बासपेट-होसकोटे सॅटेलाइट टाउन रिंग रोडवर हा अपघात झाला. एका १७ वर्षीय मुलाने आपली हाय-स्पीड एसयूव्ही सुसाट वेगाने पळवत असताना आधी समोरून जाणाऱ्या 'गगन' नावाच्या तरुणाच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत गगनचा जागीच मृत्यू झाला. मात्र, गाडीचा वेग इतका जास्त होता की, बाईकला उडवल्यानंतर ही कार थेट पुढे चाललेल्या ट्रकला जाऊन धडकली.
ट्रकचे तुकडे झाले, चाके पडली लांब!
कारची धडक इतकी जोरदार होती की, ट्रकचा मागच्या बाजूचा चाकांचा जोडा आणि एक्सल तुटून थेट रस्त्यावर पडला. ट्रक रस्त्यावरून घसरून थेट सर्व्हिस रोडवर जाऊन उलटला. ट्रक चालक बालासुब्रमण्यम या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. काही क्षणातच संपूर्ण रिंग रोडवर गाडीच्या काचा आणि मृतदेहांचा खच पडला होता. या भीषण अपघातानंतर काही वेळातच दुसरी एक कार ट्रकच्या पडलेल्या भागाला आदळली, सुदैवाने त्यातील प्रवासी किरकोळ जखमी झाले.
मृतकांमध्ये ५ अल्पवयीन मुले
या
अपघातातील मृतांची नावे समोर आली असून, ती ऐकून पालकांच्या काळजाचे पाणी
होत आहे. या अपघातात अल्पवयीन मुलांसह २६ वर्षीय मोहम्मद फरहान आणि
दुचाकीस्वार गगन याचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी
धाव घेऊन गॅस कटरच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी
पाठवले.
वेगाची नशा ठरली जीवघेणी
पोलीस तपासात समोर आले आहे की, कारचा वेग १६० किमी प्रतितास पेक्षा जास्त होता. अपघातानंतर कारचा अक्षरशः पत्रा झाला आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणे आणि वेगावर नियंत्रण नसणे यामुळे सात हसत्याखेळत्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.