Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एप्स्टिन फाइल्स : तुम्ही लाख श्रीमंत असाल, पण आम्ही विकले जाणार नाही!

एप्स्टिन फाइल्स : तुम्ही लाख श्रीमंत असाल, पण आम्ही विकले जाणार नाही!
 

वृत्तपत्रात काम करणाऱ्या बातमीदारांना रोजच्या रोज एक प्रश्न सोडवावा लागतो. आज कोणती बातमी फाइल करू? अशा स्थितीत जी प्रसिद्ध होण्याची काहीच शाश्वती नाही, अशा बातमीवर वर्ष – दीड वर्षं काम करत राहण्याचा ताण काय असेल? सत्ता, पैसा, प्रतिष्ठा ज्यांच्या पायाशी लोळण घेतात अशांचे मातीचे पाय दाखवून देताना प्रत्येक पाऊल किती जपून टाकावं लागत असेल? आज एप्स्टिन फाइल्सने जग ढवळून काढलं आहे, पण इथवर पोहोचताना मियामी हेराल्ड वृत्तपत्राची बातमीदार ज्युली ब्राऊनने किती पातळ्यांवर लढा दिला असेल, याची कल्पनाही न पेलवणारी!

बातम्यांचं जग वेगानं बदलत होतं. वृत्तपत्रांना वृत्तवाहिन्यांशी स्पर्धा करावी लागत असतानाच त्यात डिजिटल माध्यमांचीही भर पडली होती. सारं काही वेगवान… मिनिटा मिनिटाला अपडेट होणारं. ज्युली जुन्या पठडीतली वार्ताहर. अनुभवी, अभ्यासू, पण त्यामुळेच कालबाह्य होण्याची टांगती तलवार डोक्यावर. त्यात एकल पालक असल्यामुळे एकटीच्या खांद्यांवर दोन मुलांची जबाबदारीही होती. नोकरी गमावणं परवडणार नव्हतं. खरं तर एवढा उपद्व्याप करण्याची तिला काहीच गरज नव्हती. तिच्यावर जबाबदारी होती फ्लोरिडातल्या जाचक कारागृहांविषयी, लांबलचक शिक्षांविषयी बातमीदारी करण्याची. तेवढंच करून ती तगून राहू शकली असती. पण तिच्यातला पत्रकार तिला शांत बसू देत नव्हता. ती वेश्या व्यवसायात बळजबरीने आणल्या जाणाऱ्या मुलींवर बातमी करत होती. इंटरनेटवर माहिती शोधताना दरवेळी एप्स्टिनचाच उल्लेख येत होता. एवढी कुकर्मं करूनही एप्स्टिन सहीसलामत कसा सुटला? त्याच्या वकिलांची फौज बलात्कारग्रस्त मुलींना व्यावसायिक वेश्या ठरवण्यासाठी वाट्टेल ते प्रश्न विचारत असताना सरकारी वकील शांत का बसले? शोषित मुलींच्या चारित्र्याची चिरफाड आणि आरोपी एप्स्टिनची मात्र नावापुरती उलटतपासणी… असं का? तिला उत्तरं हवी होती, पण ती एवढी सहज मिळणं अशक्य होतं. त्यासाठी लागणार होता वेळ आणि ताज्या, गरमागरम बातम्यांसाठी भुकेल्या आजच्या जमान्यात ही शिळीपाकी बातमी कोणालाच महत्त्वाची वाटत नव्हती. अगदी तिच्या संपादकांनाही. कारण एप्स्टिन अटक होऊन सुटला होता आणि त्याची फाइल बंद झाली होती.

…पण 'मी टू' मोहीमेचा वणवा जगभर पसरला आणि या बातमीसाठी काही का असेना, पण निमित्त निर्माण झालं. संपादकांनी थोडा आणखी संयम दाखवत या बातमीवर काम सुरू ठेवण्याची मुभा दिली. परवानगी मिळाली असली तरी बातमीचा माग काढणं सोपं नव्हतं. या प्रकरणाच्या दोन तपास अधिकारी मिशेल रेटर आणि जो रिकारी पत्रकारांना माहिती देऊन थकून गेल्या होत्या. ज्युलीच्या आधी अनेकजण त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. या प्रकरणातल्या बातमीदारीत एक पॅटर्न त्यांच्या लक्षात आला होता. एखादा पत्रकार येतो. मुलाखत घेतो. निघून जातो. मुलाखत कधीही प्रसिद्ध होत नाही. बातमीदाराची मात्र क्राइम बीटवरून उचलबांगडी होते. हे अनेकांच्या बाबतीत घडलं होतं. त्यामुळे ज्युली त्यांच्यापर्यंत पोहोचेतो त्यांचा मुलाखती देण्याचा उत्साह मावळला होता.
ज्युलीला या मुलींना भेटून एप्स्टिनची कार्यपद्धती आणि यात सहभागी असलेल्या बड्या धेंडांची माहिती मिळवायची होती. पण पोलिसांनी मुलींची ओळख उघड होऊ नये म्हणून त्यांची नोंद जेन डो या एकाच नावाने केली होती. प्रत्येक मुलीला १, २, ३ असे क्रमांक देण्यात आले होते. ज्युलीने शेकडो कागदपत्रं वाचून काढली. नोंदी केल्या. मग शोषण झालं तो काळ, मुलीचं वर्णन, तिचं वय असे अतिशय कमकुवत, अस्पष्ट संदर्भ जोडून ती पहिल्या मुलीपर्यंत पोहोचली आणि त्यातून एक एक दुवा गवसत गेला.

मुलींचा ठावठिकाणा कळला की पुढचं मोठं आव्हान होतं हा विषय कसा काढायचा. तेव्हा किशोरवयीन असलेल्या या सर्व मुली आता मध्यमवयीन होत्या. त्यातल्या अनेकींनी याबद्दल कोणालाच काहीही अद्याप सांगितलेलं नव्हतं. काही मानसिक आजार, व्यसनाधीनतेशी झगडत होत्या. थेट जाऊन दरवाजा ठोठावून प्रश्न विचारावेत, इतकं सरळ हे प्रकरण नव्हतं. ज्युलीनं पत्र पाठवून संपर्क साधण्यास सुरुवात केली. प्रतिसाद आलाच, तर भेटून बोलावं असा विचार होता. पण कोवळ्या वयातल्या ज्या भयंकर अनुभवाने आयुष्यभर मनोरुग्णासारखी अवस्था केली, त्यावर बोलणं या महिलांसाठी जीवघेणा अनुभव होता. एक एक दुवा जोडला जाऊ लागला. एकूण ६० मुली ज्युलीनं शोधून काढल्या. तिनं आणि तिची कॅमारावुमन एमिलीनं देशाच्या कानाकोपऱ्यांत जाऊन या मुलींच्या भेटी घेतल्या, मुलाखती रेकॉर्ड केल्या.

यांपैकी बहुतेक मुली बेघर तरी होत्या किंवा अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या होत्या. गरिबांना असून असून कितीसा आवाज असणार? तो कधीही दाबता येईल याची खात्री एप्स्टिनला होती. त्यातल्या काही मुलींना शिक्षणासाठी पैशांची गरज होती, तर काहींना जगण्यासाठी. मसाज करायचे एवढे पैसे का मिळतील आणि तेसुद्धा कोणतंही प्रशिक्षण वा अनुभव गाठीशी नसताना, असा प्रश्न पडण्याएवढी प्रगल्भता १३-१४ वर्षांच्या कितीशा मुलींमध्ये असते? तिथे गेल्यावर काय झालं हे सांगताना त्यांची अवस्था अतिशय दयनीय होत असे. या शोषणातून सुटका करून घेण्यासाठी मुलींना त्यांच्याचसारखी एखादी कोवळी मुलगी आणण्यास सांगितलं जाई. नरकातून सुटका व्हावी म्हणून त्या आणतही. यातून एकीकडे एप्स्टिन आणि त्याच्या क्लाएंट्सचा आनंद द्विगुणित होत असताना या कोवळ्या मुलींमधल्या अपराधीपणाच्या भावनेचाही गुणाकार होत होता. हे सारं आपल्याच मूर्खपणामुळे आपण ओढावून घेतलं आणि त्यात इतरांनाही ओढलं ही टोचणी त्यांना आयुष्यभर लागून राहिली. बहुतेक मुली त्यातून कधीच बाहेर येऊ शकल्या नाहीत.

ज्युली एकामागोमाग एक मुलगी शोधून तिची गोष्ट जाणून घेत होती. ज्युलीचं तोंड बंद करणं एप्स्टिन आणि त्याच्या चमच्यांसाठी काही कठीण काम नव्हतं. पण त्यांनी या क्षुल्लक पत्रकाराकडे दुर्लक्ष केलं. या ब्राऊन बाईसारखे पन्नास पाहिलेत, आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही, याची त्यांना खात्रीच होती. त्यात ज्युली केवळ शोषितांची माहिती शोधत होती. ती एप्स्टिनबरोबर आफ्रिकेत महिनाभराच्या सहलीला गेलेले बिल क्लिंटन वा त्याच्याशी लागेबंधे असलेले डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठपुरावा करत नव्हती, त्यामुळे यंत्रणाही निर्धास्त राहिल्या असाव्यात.

ट्रम्प यांचा पहिला कार्यकाळ सुरू झाला आणि अलेक्झांडर अकोस्टाची लेबर सेक्रेटरी म्हणून नेमणूक झाली. या अकोस्टानेच दक्षिण फ्लोरिडाचे ॲटर्नी असताना एप्स्टिनला फावल्या वेळात तुरुंगात ये आणि बाकीचा वेळ आपल्या प्रतिष्ठित क्लाएंटची कामं कर अशी मोकळीक दिली होती. ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांना याची नीट कल्पना असणार आणि तरीही आता त्याला काळ लोटला, असं म्हणत त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं असणार, असा ज्युलीचा कयास होता.

एका सामान्य स्थानिक वृत्तपत्राची बातमीदार करून करून काय करू शकणार? या भ्रमात असलेल्या एप्स्टिन आणि कंपनीला मियामी हेराल्डने जबरदस्त दणका दिला. सत्ता, संपत्ती, यंत्रणा, प्रतिष्ठा सारं काही ज्यांच्या पायाशी लोळण घालतं ते कधीही कोणालाही पायदळी तुडवू शकतात, याची त्या वृत्तपत्रातल्या उच्चपदस्थांना कल्पना नसेल असं नाही. त्यात या प्रकरणात असे एक-दोन नव्हे, तर शेकडो लोक होते. एखादं वृत्तपत्र कायमचं बंद करणं त्यांना कितीसं कठीण होतं? पण मियामी हेराल्डने आपलं सर्वस्व पणाला लावून पत्रकारिता धर्म पाळण्याचा पर्याय स्वीकारला. १८ नोव्हेंबर २०१८ला ज्युलीच्या शोधपत्रकारितेवर आधारित वृत्ताला मियामी हेराल्डने प्रसिद्धी दिली आणि जग ढवळून निघालं. एप्स्टिनला पुन्हा अटक झाली. अकोस्टाने त्याच्या पदाचा राजीनामा दिला. त्या एका वृत्ताने जगातल्या बहुतेक देशांतील बड्या असामींचा खरा चेहरा चव्हाट्यावर आणला.
एप्स्टिन फाइल्स ही शोषितांना न्याय मिळवून देण्याची कथा आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पैशाच्या जोरावर आम्ही काहीही करू शकतो, कोणालाही चुरगळून फेकून देऊ शकतो, गरीब हे आपल्या मनोरंजनासाठी, सेवेसाठी आणि पायदळी तुडवले जाण्यासाठीच असतात, ते आपल्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत, आपल्याकडे पैसा-सत्ता-प्रतिष्ठा असेल तर कोणी आपल्याविरोधात तोंड उघडून ब्र काढू शकत नाही, अशी खात्री बाळगणाऱ्यांच्या मुस्काटात मारलेली सणसणीत चपराक आहे. ज्युली ब्राऊन ही आज दुर्मीळ झालेल्या, पण शंभर टक्के प्रतिकूल वातावरणातही तगून असलेल्या सच्च्या पत्रकारांची प्रतिनिधी आहे. तुम्ही खोऱ्याने पैसे ओढत असाल, पण तरीही आम्हाला विकत घेऊ शकत नाही, आम्ही विक्रीसाठी उपलब्ध नाही, हे ठणकावून सांगणारा खणखणीत आवाज आहे. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर असे काही मोजकेच आवाज जगाला तारत आले आहेत. ज्युली ब्राऊन अशा दुर्मीळांतली एक!
 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.