सर्वसामान्यांना लाठी आणि आरोपीला मटणाची वाटी; कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजेच्या संचालकासोबत पोलिसांचे हॉटेलात जेवण
टीडब्ल्यूजे कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संचालक संकेश घाग याला पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच अटक केली होती. मात्र या आरोपीला पोलिसांनी व्हीआयपी ट्रिटमेंटमध्ये चिपळूण शहरातील प्रसिद्ध अशा हॉटेलमध्ये जेवायला नेले. पोलीस आरोपीच्या बाजूला बसून जेवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. यावरून सर्वसामान्यांना लाठी आणि आरोपीला मटणाची वाटी असे चित्र पहायला मिळत आहे.
टीडब्ल्यूजे पंपनीचा संचालक संकेश घाग याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी आरोपी संकेश घागला चिपळूण शहरातील हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.पोलीस अंमलदारही त्याच्या बाजूला बसून जेवण करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. आता या पोलिसांवर गृह खाते काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुती सरकारच्या राज्यात गुन्हेगारांना राजाश्रय मिळतो अशी अवस्था झाली आहे. चिपळूणमध्ये कोटय़वधी रुपयांना चुना लावून पळालेल्या टीडब्ल्यूजेच्या संचालकाला पोलिसांनी पकडले, मात्र त्याची शाही बडदास्त ठेवत त्याला हॉटेलमध्ये जेवायला नेले. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कोणत्याही आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाणार नाही. आर्थिक गुह्यातील आरोपीची सर्व मालमत्ता जप्त केली जाईल. आरोपीकडून वसुली करून गोरगरीबांनी केलेली गुंतवणूक परत देण्यावर भर राहील.योगेश कदम, गृहराज्यमंत्री महाराष्ट्र
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.