Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजितदादांच्या विमान अपघातातील पायलट जिवंत? पत्नीची इन्स्टा पोस्ट व्हायरल, म्हणाली 'माझे पती...'

अजितदादांच्या विमान अपघातातील पायलट जिवंत? पत्नीची इन्स्टा पोस्ट व्हायरल, म्हणाली 'माझे पती...'
 

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य सुन्न झालं आहे. या अपघातात अजित पवारांसह विमानातील सर्वच ५ जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. पण आता या विमान अपघाताबाबत एक गोंधळ निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. ज्या विमानातून अजित पवारांनी प्रवास केला होता. त्या विमानाचा पायलट जिवंत असल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. याबाबत आता पायलटच्या पत्नीने इन्स्टाग्राम पोस्ट लिहित आपले पती जिवंत असल्याचं सांगितलं आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि फोटो व्हायरल झाल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. अखेर संबंधित पायलटच्या पत्नीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सत्य परिस्थिती जगासमोर आणली आहे.


नेमका गोंधळ कुठे झाला?
 
बुधवारी सकाळी 'लिअरजेट ४५' या विमानाने मुंबईहून बारामतीकडे उड्डाण केले, मात्र काही वेळातच हे विमान कोसळले. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर विमानाचे 'मूव्हमेंट लेटर' सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. या पत्रावर कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश यांची नावे पायलट म्हणून नोंदवण्यात आली होती. हे पत्र पाहून नेटिझन्सनी खातरजमा न करता कॅप्टन साहिल मदान यांचे फोटो शोधून त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली.
 
पत्नीची भावूक पोस्ट: "माझे पती सुरक्षित"
कॅप्टन साहिल मदान यांचा फोटो सर्वत्र व्हायरल झाल्यावर त्यांच्या पत्नी, प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट संजाम सहनी यांनी इन्स्टाग्रामवर एक स्पष्टीकरणाची स्टोरी शेअर केली. त्यांनी अत्यंत कळकळीने विनंती केली की, "कृपया या बातम्या थांबवा. कॅप्टन साहिल मदान माझे पती आहेत आणि ते त्या अपघातग्रस्त विमानात नव्हते. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत." संजाम यांच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावरील अफवांना पूर्णविराम मिळाला. केवळ कागदोपत्री नाव असल्यामुळे हा मोठा गैरसमज झाला होता.
ऐनवेळी पायलट बदल्याने गोंधळ

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण करण्यापूर्वी शेवटच्या क्षणी वैमानिक बदलण्यात आले होते. मूळ नियोजनानुसार कॅप्टन साहिल मदान जाणार होते, परंतु ऐनवेळी ही जबाबदारी कॅप्टन सुमित कपूर यांच्याकडे सोपवण्यात आली. नियतीचा खेळ असा की, ज्या विमानाचे सारथ्य सुमित कपूर यांनी केले, त्याच विमानाला भीषण अपघात झाला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
 
या दुर्घटनेतील मृतांची अधिकृत नावे
१. अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
२. विदिप जाधव (सुरक्षा रक्षक)
३. कॅप्टन सुमित कपूर (मुख्य वैमानिक)
४. शांभवी पाठव (सह-वैमानिक)
५. पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट)

एकीकडे राज्याने एक मोठा नेता गमावला असताना, दुसरीकडे सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीमुळे एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित करण्याचा प्रकार घडला आहे. पण साहिल मदान यांच्या पत्नीने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे यामागचं सत्य समोर आलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.