Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'माणूस 13-14 दिवस तरी गप्प बसतो, जनाची नाही, मनाची तरी, सगळंच सोडलं का?' गिरीश बापटांच्या निधनानंतर निवडणूक विचारणाऱ्यांवर अजितदादा भडकलेला संजय राऊतांनी तो व्हिडिओच समोर आणला!

'माणूस 13-14 दिवस तरी गप्प बसतो, जनाची नाही, मनाची तरी, सगळंच सोडलं का?' गिरीश बापटांच्या निधनानंतर निवडणूक विचारणाऱ्यांवर अजितदादा भडकलेला संजय राऊतांनी तो व्हिडिओच समोर आणला!
 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भीषण विमान अपघातात निधन झाल्यानंतर पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची पदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या. सुनेत्रा पवार यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना काल (31 जानेवारी) पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अजित पवार यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून एकमताने निवड झाली. ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते म्हणून त्यांचे नाव प्रस्तावित केले आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्याला अनुमोदन दिले.


संजय राऊत यांनी व्हिडिओ ट्विट केला
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून झालेल्या निर्णयांवरून पवार कुटुंबात फूट पडल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शपथविधीची काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे, शपथविधीसाठी झालेल्या गडबडीवरूनही सोशल मीडियात टीकेचा सूर आहे. यासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांविरोधात सर्वाधिक रोष दिसून येत आहे. दरम्यान, आता या टीकेनंतर आयुष्यभर रोखठोक बोललेल्या दिवंगत अजित पवार यांचा खासदार संजय राऊत यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे. दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीनंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यानंतर अजित पवारांच्या संतापाचा उद्रेक झाला होता.
सगळंच कुठं सोडलं का? काय चाललंय काय?

अजित पवार म्हणतात, आम्ही गिरीश बापटांच्या घरी गेलो होतो तेव्हा अस्थिविसर्जन सुद्धा झाल्या नव्हत्या, मला पहिल्या दिवशी अंत्यविधीला जाता आलं नाही, मी तिसऱ्या दिवशी गेलो, आमचे जयंतराव दुसऱ्या दिवशी जाऊन आले. निवडणूक नाही लागली, तर काहींचे जीव चाललेत. जनाची नाही, मनाची नाही, सगळंच कुठं सोडलं का? काय चाललंय काय? तुमच्या आमच्या घरात दु:खद घटना घडल्यास आम्ही 13-14 दिवस शांत बसतो, मग महिनाभर शांत बसलं म्हणून बिघडलं कुठं? कोण भावी खासदार पोस्टर लावत आहे. अरे, कुठे गुडघ्याला बाशिंग बांधून निघालात? अशीही विचारणा ते शेवटी करतात. संजय राऊत यांनी हाच व्हिडिओ ट्विट करत असे होते दादा…. कुठे गुडघ्याला बाशिंग बांधून निघालात? अशी विचारणा केली आहे. या ट्विटमध्ये राऊत यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल आणि शरद पवार यांना टॅग केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक
दरम्यान, विधानभवनात दिवंगत नेते अजित पवार यांच्या कार्यालयात एक महत्त्वाची विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. बैठकीदरम्यान, सुनेत्रा पवार यांनी पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यांचा धाकटा मुलगा जय पवार देखील उपस्थित होता. यावेळी अनेक मंत्री आणि आमदार भावूक झाले. सुनेत्रा पवार यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघातून लढवली होती पण त्यांना यश आले नाही. त्यांचा सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाला. त्यानंतर पवार राज्यसभेवर गेल्या. अजित पवार यांचे 28 जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. त्यांचे विमान लँडिंगपूर्वीच कोसळले. अजित पवारांव्यतिरिक्त या अपघातात इतर चार जणांनाही आपला जीव गमवावा लागला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.