चंद्रकांतदादांच्या सत्तेच्या स्वप्नाला जयंतरावांकडून सुरुंग; राष्ट्रवादी अन् शिवसेनेला दिली 'त्या' धोक्याची कल्पना!
सांगली जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्तेचे गणित मांडताना स्वतंत्र लढलेले महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे सूतोवाच केले होते. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना पक्षाचा व्हीप मानावाच लागेल,
असा गर्भित इशाराही दिला होता. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र
पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस
आणि शिवसेनेला धोक्याचा इशारा देताना चंद्रकांतदादांच्या सत्तेच्या
स्वप्नाला सुरुंग लावण्याची वात पेटवली आहे.
सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक १८ जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिंकल्या आहेत. तसेच, काँग्रेस पक्षाने ११, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने १ जागा जिंकली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीकडे एकूण ३० संख्याबळ झाले आहे. दुसरीकडे भाजपने १६ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस ०६, शिवसेना ०७, रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्य पक्षाने प्रत्येकी एक अशा एकूण ३१ जागा जिंकल्या आहेत.
महायुतीमध्ये राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. शिवसेनेला तर भाजपने युतीसाठी शेवटपर्यंत ताटळकत ठेवले होते. शेवटी तर शिवसेनेला एक आकडी जागा देण्याचा प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला होता. शेवटी शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवत सात जागा जिंकल्या आहेत. भाजपच्या झालेल्या त्रासाला वैतागूनच शिवसेनेचे संपर्कमंत्री शंभूराज देसाई यांनी निकालानंतर आमची भूमिका ठरविणारा भाजप कोण, असा खडा सवाल विचारला होता.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्तेचे गणित मांडले होते. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना व्हीप पाळावाच लागेल, असा गर्भित इशारा दिला होता. त्यावरून जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हा स्वतंत्र पक्ष आहे. व्हिप आणि नियमांची भीती दाखवून भारतीय जनता पक्षाकडून दादागिरी केली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे भाजपच्या विरोधात लढले आहेत, त्यामुळे त्यांनी आता भाजपसोबत जाऊ नये. ते जर भाजपसोबत गेले तर जनतेमध्ये त्यांची प्रतिमा मलीन होईल, असा इशारा देताना जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या सत्तेच्या स्वप्नाला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
जयंत
पाटील म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषद आणि
पंचायत समितीच्या निवडणुकीत आघाडी होती. तर आम्ही शिंदेसेनेच्या विरोधात
उमेदवार उभे केले नव्हते, त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेच्या
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हे दोन्ही आम्हाला पाठिंबा देतील, अशी आमची
अपेक्षा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.