Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या

Breaking News! जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
 
 
मोठ्या घोटाळ्याने जालना जिल्हा हादरला आहे . 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात 31 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहे. या प्रकरणात चक्क सरकारी बाबूंनी 'शेतकरी' बनून तिजोरीवर डल्ला मारला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यात समोर आला आहे. अतिवृष्टी अनुदानाच्या नावाखाली तब्बल 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा डल्ला मारणाऱ्या 31 आरोपींना जालना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. यात तलाठी, तहसील कर्मचारी आणि संगणक तज्ज्ञांचा समावेश असून, या मोठ्या कारवाईने महसूल विभागात खळबळ माजली आहे.

असा उघड झाला 25 कोटींचा महाघोटाळा

जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. सरकारने जाहीर केलेले अनुदान गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याऐवजी, येथील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने एक भयानक कट रचला.  बनावट नावे आणि नोंदी करून ज्यांच्या नावावर एक गुंठाही जमीन नाही, अशा व्यक्तींची नावे लाभार्थी यादीत घुसडण्यात आली धक्कादायक म्हणजे तहसीलदारांचे 'लॉगिन' आणि 'पासवर्ड' चोरून प्रणालीमध्ये फेरफार करण्यात आले. घोटाळा उघड होऊ नये म्हणून कागदोपत्री आणि डिजिटल पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला.

आर्थिक गुन्हे शाखेचा 'सर्जिकल स्ट्राईक'
जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीने या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींनी मोबाईल बंद करून आणि सोशल मीडियापासून लांब राहत भूमिगत होण्याचा प्रयत्न केला. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत ३१ आरोपींना बेड्या ठोकल्या.
न्यायालयानेही फटकारले; अटकपूर्व जामीन फेटाळला

आरोपींनी अटक टाळण्यासाठी आधी जिल्हा सत्र न्यायालय आणि नंतर उच्च न्यायालयाच्या छत्रपति संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली होती. मात्र, तपास अधिकाऱ्यांनी मांडलेले ठोस पुरावे आणि घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने सर्व जामीन अर्ज फेटाळून लावले.

मालमत्ता जप्त होणार, बँक खाती सील!
या घोटाळ्यात आतापर्यंत 35 जणांचा सहभाग निष्पन्न झाला असून, त्यापैकी 31 जण कोठडीत आहेत. उर्वरित 4 फरार आरोपींचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे, घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरोपींच्या बँक खात्यांवर टाच आणली आहे. काही आरोपींच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात आला आहे. डिजिटल पुराव्यांसाठी मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले आहेत.
नेमके कोण आहेत आरोपी?

तलाठी: 22

तहसील कर्मचारी: 5

जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचारी: 1
 
संगणक ऑपरेटर आणि नेटवर्क इंजिनिअर्सचाही समावेश
अंबड आणि घनसावंगी तहसीलमध्ये लॉगिन पासवर्डचा गैरवापर करून हा कोट्यवधींचा अपहार करण्यात आला आहे. आतापर्यंत 31 जणांना अटक करण्यात आली असून, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. कोणालाही सोडले जाणार नाही, अशी माहिती जालन्याचे सहायक पोलिस निरीक्षक ( आर्थिक गुन्हे शाखा) मिथुन घुगे यांनी दिली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.