मुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिनियमाच्या कलम ९१नुसार दाखल झालेला हा राज्यातील पहिलाच गुन्हा आहे, असे दिव्यांग कल्याण विभागाकडून सांगण्यात आले.
दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम
मुंढे म्हणाले, 'सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तालुक्यातील एका शासकीय
रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने २०१६ ते २०१९ या
कालावधीत दिव्यांग व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या वैश्विक दिव्यांग
ओळखपत्रासंदर्भात (यूडीआयडी कार्ड) आवश्यक कार्यवाही न केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी २९ जानेवारी २०२६ रोजी इस्लामपूर पोलिस ठाण्यात प्रथम माहिती
अहवाल दाखल करण्यात आला आहे.'
डॉ. रघुनाथ राजाराम भोई (वय ६५) हे २०१६ ते २०१९ या कालावधीत इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय योजनांचा लाभ घेतला. शासन निर्णय ९ ऑक्टोबर २०२५नुसार दिव्यांगांसाठी यूडीआयडी नोंदणी अनिवार्य असतानाही संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने शासनाच्या नियमांनुसार दिव्यांग प्रमाणपत्राचे नूतनीकरण तसेच यूडीआयडी प्रणालीअंतर्गत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे दिव्यांग व्यक्ती शासकीय योजनांपासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे उल्लंघन झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मानसिक त्रास देण्यासाठी गुन्हा ः भोई
ईश्वरपूर : मूळचे दिव्यांग प्रमाणपत्र चुकीचे अपडेट झाल्याने त्याबाबत अपील करून पुढील प्रमाणपत्र मिळण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी असताना मला मानसिक त्रास देण्यासाठी दिव्यांग लाभाचा गैरफायदा घेतल्याप्रकरणी माझ्याविरुद्ध उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अध्यक्ष डॉ. नरसिंह देशमुख यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. तेव्हा, याविरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. रघुनाथ राजाराम भोई (ईश्वरपूर) यांनी प्रसिद्धिपत्रकात दिली. दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्र वैधतेबाबत दिव्यांग कल्याण विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची यूडीआयडी कार्ड पडताळणी करणे आवश्यक असून, याचाच एक भाग म्हणून राज्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.- तुकाराम मुंढे, सचिव, दिव्यांग कल्याण
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.