Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोकसभेत PM मोदींवर होती हल्ल्याची भीती, भाजपचा दावा; 'त्या' 3 महिला खासदारांची नावे आली समोर

लोकसभेत PM मोदींवर होती हल्ल्याची भीती, भाजपचा दावा; 'त्या' 3 महिला खासदारांची नावे आली समोर
 

लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेच नाहीत. आपण त्यांना न येण्याची विनंती केल्याचा खुलासा खुद्द लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज केला. काल पंतप्रधानांचे लोकसभेत सायंकाळी पाच वाजता भाषण होणार होते. त्याआधी विरोधी पक्षातील काही महिला खासदार त्यांच्या आसनापर्यंत गेल्या होत्या. त्याचा संदर्भ देत बिर्ला यांनी भीती व्यक्त केली. त्याआधी भाजप खासदारांनीही हल्ल्याबाबत भाष्य केले होते.

पंतप्रधान मोदी यांच्य भाषणाशिवाय लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव पारित करण्यात आला. विरोधकांच्या प्रचंड गदारोळमुळे हा निर्णय घेण्यात आला. काल सभागृहात घडलेल्या प्रकाराबाबत भाजपने तीव्र चिंता व्यक्त केली. तर काँग्रेसनेही भाजप या प्रकाराला अधिक रंगवत असल्याचा आरोप करत केवळ तीन महिला खासदारांना पंतप्रधान घाबरल्याची खिल्लीही उडविली आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस खासदार प्रियांका गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधानांवर हल्ला करण्याचा कोणताही प्लॅन नव्हता, असे स्पष्ट केले. त्यांनीही तीन महिला खासदारांचा उल्लेख केला. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनीही सोशल मीडियात पोस्ट करत पंतप्रधानांवर हल्ला चढविला. तुम्ही तर युध्द थांबवत होता, चीनला लाल डोळे दाखविणार होता, शी जिनपिंग, पुतिन, ट्रम्प तुम्हाला घाबरतात आणि तुम्ही तीन महिला खासदारांना घाबरलात?, असा खोचक सवाल श्रीनेत यांनी केला आहे. 
 
कोण आहेत त्या तीन महिला खासदार?
पंतप्रधान काल सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास सभागृहात येणार होते. त्यानंतर लगेच त्यांच्या भाषणाला सुरूवात होणार होती. मात्र, त्याआधी काँग्रेसच्या खासदारांनी भाषणाला विरोध करण्याची तयारी केली होती. सायंकाळी पाच वाजल्यानंतर तालिका अध्यक्ष संध्या राय खुर्चीवर विराजमान होऊन कामकाजाला सुरूवात करतात. त्यानंतर काही सेकंदातच काँग्रेसच्या काही महिला खासदार हातात बॅनर घेऊन मोदींच्या आसनासमोर जातात. त्यांच्यापाठोपाठ काही पुरूष खासदार हातात फलक घेऊन अध्यक्षांच्या आसनासमोरील रिकाम्या जागेत येतात.

महिला खासदारांमध्ये सर्वाधिक आघाडीवर होत्या त्या वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि गनीबेन ठाकोर. या तीन महिला खासदार थेट पंतप्रधान मोदींच्या आसनाजवळ फलक घेऊन गेल्याचे दिसते. याच तिघींचा सर्वांकडून उल्लेख केला जात आहे. त्यांना पाहून भाजपच्या सदस्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, पंतप्रधानांवर हल्ल्याची व्यक्त करण्यात आलेली भीती गायकवाड व धानोरकर यांनी पूर्णपणे फेटाळून लावली आहे. आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू होते. हातात फक्त बॅनर होते, कोणते हत्यार नव्हते. मग एवढी भीती कशाची होती? हातातील बांगड्यांवर आक्षेप असेल तर महिला हातात कुणाला मारण्यासाठी बांगड्या घालत नाहीत, ते त्यांच्या सौभाग्याचं लेणं असतं, असे गायकवाड यांनी म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.