छत्रपती संभाजीनगरमध्ये रक्षकच भक्षक बनल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या २३ वर्षीय तरुणीवर एका ५८ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २३ वर्षीय तरुणी मूळची नांदेडची असून पुण्यात नोकरी करते. पीडित मुलगी ७ मार्च २०२५ रोजी मोबाइल हरवल्याची तक्रार देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गेली होती. त्यावेळी तिची ओळख पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण याच्याशी झाली. त्याच दिवशी सुभाषने पीडितेला फोन केला आणि तुमच्या नंबरची खात्री करण्यासाठी तुम्हाला फोन केल्याची त्याने थाप मारली. त्यानंतर तो वारंवार पीडितेशी फोनवर बोलू लागला. त्यामुळे त्यांच्यातील जवळीक वाढून त्याचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर विविध ठिकाणी लॉजवर नेऊन संबंध ठेवले. या काळात तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध पुणे व संभाजीनगर येथे तीन वेळा गर्भपात केल्याचे तरुणीने म्हटले. त्यानंतर तिने सुभाषकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र सुभाषचे आधीच एक लग्न झाले असल्याने त्याने तिला नकार दिला, तसेच शिवीगाळ आणि मारहाण देखील केली. घडलेला प्रकार सुभाषच्या पत्नीला आणि मुलाला समजताच त्यांनी देखील तिला मारहाण करून तिचा अमानुष छळ केला. २८ जानेवारी रोजी सुभाषची पत्नी नर्मदाने नवऱ्याचा पाठलाग करू नको, गर्भपात कर, असे म्हणत मारहाण केली. आरोपीच्या मुलानेही मारहाण केल्याने पीडितेचा दीड महिन्याचा गर्भपात झाला असल्याचे तिने म्हटले. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात संबंधित अधिकारी, त्याची पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.