इस्रायलच्या संसदेत मोदींचे भाषण अन् विरोधकांचा सभात्याग; 'त्या' Video मुळे चर्चेला उधाण, पण नेमकं घडलं काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इस्रायलच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलचे सर्वोच्च कायदेमंडळ असलेल्या 'क्नेसेट'मध्ये भाषण केले. मात्र पंतप्रधान मोदींच्या क्नेसेट
भेटीवेळी इस्रायलमधील विरोधी पक्षांचे नेते हे सभागृहातून बाहेर जाताना
पाहायला मिळाले. यावरून वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत इस्रायलमध्ये
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषणाला उभे
राहिल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात
आहे.
पण खरंच तसं काही झालं का?
सोशल मीडियावर इस्त्रायलच्या संसदेतील विरोधक सभागृहातून बाहेर जात असतानाचा व्हिडीओ शेअर केला जात आहे. याबोरबरच मोदी संबोधनासाठी उभे राहताच विरोधकांनी सभात्याग गेल्याचा दावा देखील केला जात आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळत आहे. मात्र या संपूर्ण घटनेमागील वास्तव काहीतरी वेगळेच असल्याची बाब समोर आली आहे.
इस्रायलच्या संसदेत नेमकं झालं काय?
क्नेसेटमध्ये
संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांचे भाषण होणार होते, या भाषणासाठी
इस्रायलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अध्यक्ष इसाक अमित यांना न बोलवण्याचा
निर्णय क्नेसेटच्या अध्यक्षांनी घेतला. यानंतर विरोधकांनी इस्रायलचे
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे भाषण सुरू असताना सभात्याग केल्याचे
पाहायला मिळाले.
यावेळी
जेव्हा क्नेसेटचे सदस्य सभागृहामधून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच माजी
युतीमधील खासदारांनी त्यांच्या रिकाम्या जागी बसून घेतले. इस्रायली
ब्रॉडकास्टर Kan ने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा विरोधकांनी बहिष्कार
टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता, तेव्हाच क्नेसेटचे अध्यक्ष यांनी स्पष्ट
केले होते की, पंतप्रधान मोदी हे काही रिकाम्या सभागृहाला संबोधित करणार
नाहीत.
इस्रायलमधील विरोधकी पक्षांनी काय सांगितलं?
दरम्यान
अनेक विरोधी पक्षांनी ते पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या भाषणाला
उपस्थित राहाणार नाहीत, आणि जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे भाषण
सुरू करतील तेव्हाच दोन देशांमधील संबंधांचा आदर म्हणून ते पुन्हा
सभागृहामध्ये परत येतील अशी निवेदने जारी केली. "दोन्ही
देशांमधील युतीचा आदर राखण्यासाठी आणि पंतप्रधान मोदी इस्रायलच्या पाठीशी
उभे राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी आम्ही फक्त भारताच्या
पंतप्रधानांच्या भाषणासाठी परत येऊ," असे विरोधी पक्ष येश अतिद (Yesh Atid)
आणि यिस्रायल बेयतेनु (Yisrael Beytenu) यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले
आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नेतन्याहू यांच्या भाषणावर बहिष्कार टाकल्यानंतर पुन्हा क्नेसेटमध्ये प्रवेश करताना, विरोधी पक्षनेते याएर लॅपिड (Yair Lapid ) यांनी पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलन केले आणि त्यांचे क्नेसेटमध्ये स्वागत केले. लॅपिड यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की, विरोधकांनी विशेष अधिवेशनातून सभात्याग करण्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. ज्यावर युतीमधील खासदारांकडून निषेध करण्यात आला. ज्यावर प्रतिसाद देताना ते म्हणाले की "गोष्टी आणखी खराब होऊ नयेत म्हणून प्रयत्न करूयात."क्नेसेटमधील आपल्या भाषणात लॅपिड यांनी इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि त्यांच्या भाषणासाठी उत्सुक असल्याचेही ते म्हणाले. "संपूर्ण इस्रायल तुमचे नेतृत्व, तुमची मैत्री, आमच्या संकटाच्या काळात तुम्ही येथे होतात याबद्दल, आणि युतीबद्दल, आपल्या दोन देशांमधील निरंतर युतीबद्दल आदराची भावनेने भरलेला आहे," असे लॅपिड म्हणाले.
"त्यामुळे
येथे आल्याबद्दल तुमचे खूप आभार. आणि आम्ही सर्वजण, दोन्ही बाजूंचे लोक
तुमचे भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहोत," असे ते पुढे बोलताना म्हणाले. पंतप्रधान
मोदी यांच्याबरोबर हस्तांदोलनाच्या क्षणाचा फोटो एक्सवर पोस्ट करत लॅपिड
यांनी लिहिले की, "भारताचे पंतप्रधान मोदी, संपूर्ण इस्त्रायल तुमचे
नैतृत्व, तुमची मैत्री, तुमचे कठीण काळात आमच्याबरोबर उभे राहणे, याचे
महत्त्व ओळखतो. येथे आल्याबद्दल आपले आभार."
क्नेसेटमध्ये मोदी काय म्हणाले?
'क्नेसेट'मध्ये भाषण करणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. यावेळी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू आणि इतर अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर दोन्ही देश एकत्र असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींनी म्हणाले की, "या सन्माननीय सभागृहासमोर उभं राहणं माझ्यासाठी एक भाग्य आणि सन्मान आहे. मी हे भारताचा पंतप्रधान म्हणून आणि एका प्राचीन संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या संस्कृतीला संबोधित करत आहे. मी माझ्यासोबत १४० कोटी भारतीयांच्या शुभेच्छा, मैत्री, आदर आणि भागीदारीचा संदेश घेऊन इस्रायलमध्ये आलो आहे."मोदी पुढे म्हणाले की, "नागरिकांच्या हत्येचं कधीही समर्थन करू शकत नाही. दहशतवादाचं कोणीही समर्थन करू शकत नाही. भारतानेही बऱ्याच काळापासून दहशतवादामुळे दुःख सहन केलंय. २६/११ च्या मुंबई हल्ल्यात इस्रायली नागरिकांसह निष्पाप जीव गमावल्याचं दुःख आजही आम्हाला आहे. तुमच्याप्रमाणे आमचंही दहशतवादाबद्दल शून्य-सहिष्णुता धोरण आहे." "गेल्या काही वर्षांपासून भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच भारत जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सामील होईल. गेल्या काही वर्षांत भारताने इतर देशांबरोबर अनेक महत्त्वाचे व्यापारी करार केले आहेत. त्यासाठी आमची टीम एका मोठ्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीसाठी कठोर परिश्रम घेत आहे", असंही मोदींनी यावेळी म्हटलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बुधवारी इस्रायलमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आगमन झालं. त्यावेळी त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान मोदींचा गेल्या नऊ वर्षांतील इस्रायलचा हा दुसरा दौरा आहे. जुलै २०१७ मध्ये मोदी इस्रायलमध्ये आले होते. त्या वेळी दोन्ही देशांतील संबंधांना सामरिक भागीदारीचा दर्जा देण्यात आला. पंतप्रधान मोदींनी इस्रायलच्या संसदेला संबोधित केलं. नेतान्याहू आणि मोदी गुरुवारी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहेत. इस्रायलच्या दौऱ्यापूर्वी जाताना मोदी यांनी दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील, याची खात्री असल्याचे वक्तव्य केलं होतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.