Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सगळ्या चर्चांना अखेर पूर्णविराम! राष्ट्रवादीत सुनेत्रा पर्वाला सुरुवात; अधिवेशनात मोठी घोषणा

सगळ्या चर्चांना अखेर पूर्णविराम! राष्ट्रवादीत सुनेत्रा पर्वाला सुरुवात; अधिवेशनात मोठी घोषणा
 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी केली. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा भरारी येईल, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.

प्रफुल पटेल यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्व गुणांचं तोंड भरुन कौतुक केलं. नेतृत्व कसं असावं याचं उत्तम उदाहरण अजित पवार यांनी समोर ठेवलं. व्यक्ती पदानं नव्हे, तर कर्तृत्त्वानं महान होते. दादा सर्वाथानं दादा होते, ते कधीही खचले नाहीत. पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी अजितदादांच्या मनात तळमळ होती, अशा शब्दांत पटेल यांनी अजित पवारांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं. अजित पवारांमुळे राष्ट्रवादीला वैभवाचे दिवस आले, असं पटेल म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शपचे आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. सध्या काही जण आम्हाला पक्ष कसा चालवायचा, याचे सल्ले देत आहेत. ज्यांचं आमच्या पक्षाशी काहीही देणंघेणं नाही, ते आम्हाला उपदेश करत आहेत. महिन्याभरात तुम्ही पाहिलंच असेल. काही जण इकडे तिकडे फिरत आहेत. त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक, अशी परिस्थिती आहे, असं म्हणत पटेलांनी रोहित पवारांचा अप्रत्यक्षपणे समाचार घेतला. 
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झालं. मुंबईहून बारामतीला जात असताना अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला. त्यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे जाणार याबद्दलची चर्चा सुरु झाली. या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे.

सुनेत्रा पवार यांनी २०२४ मध्ये बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवली. पण राष्ट्रवादी शपच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी त्यांचा पराभव केला. यानंतर याच वर्षी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागली. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सुत्रं हाती घेतली. आता पक्षाची धुरादेखील त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. लवकरच त्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देतील आणि बारामतीमधून विधानसभेची पोटनिवडणूक लढवतील. ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.