वैद्यकीय क्षेत्रातील नोकरी ही फारच जबाबदारीची मानली जाते. येथे एक चुकीचा निर्णय अनेकांच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळेच अगदी डॉक्टर असो किंवा औषधं देणारी व्यक्ती असो सर्वांनी आपआपलं काम जबाबदारीनं करणं अपेक्षित असतं. मात्र याच जबाबदारीच्या अपेक्षेला सुरुंग लावणारा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये डॉक्टरांचे दोन वेगवेगळे ग्रुप एकाच वेळी दोन रुग्णांवर ऑपरेशन करताना दिसत आहेत. मात्र हे ऑपरेशन करताना दोन्ही ग्रुपमध्ये स्पर्धा लावण्यात आलेली अशी हादरवून टाकणारी माहिती पुढे आली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी सोशल मीडियावरुन या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. रुग्णाच्या जीवापेक्षा असल्या थिल्लर स्पर्धांना महत्त्व देणाऱ्या डॉक्टरांना कामावरुन काढून टाकून त्यांच्याविरोधात कारवाई करावी असं अनेकांनी म्हटलं आहे. तातडीने या ऑपरेशन थिअटरमधील सर्वांना निलंबित करा अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे.
व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?
व्हिडिओमध्ये कथितरित्या डॉक्टरांच्या दोन टीम एका ऑपरेशन थिएटरमध्ये वेगवेगळ्या रुग्णांवर सी-सेक्शन ऑपरेशन करताना दिसत आहेत. व्हिडिओ रेकॉर्ड करणारे लोक दोन्ही टीमला शक्य तितक्या लवकर शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला देताना ऐकू येतात. हा व्हिडीओ पाकिस्तानमधील असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या व्हिडिओची सत्यता आणि तो रेकॉर्ड व प्रसारित होण्यामागील परिस्थितीची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही हे नमूद करणं आवश्यक आहे. मात्र या माध्यमातून या डॉक्टरांनी दोन्ही गर्भवती महिला आणि जन्माला येणाऱ्या दोन्ही बाळांचे जीव धोक्यात टाकल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नेमका कोणत्या रुग्णालयात घडला हा प्रकार
लाहोरमधील '24 न्यूज एचडी'नुसार, ही घटना शहरातील लेडी विलिंग्डन रुग्णालयात घडली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होऊन टीका झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. "समिती व्हिडिओची सविस्तर तपासणी करेल आणि दोषी आढळलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल," असे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक, डॉ. फराह यांनी '24 न्यूज एचडी' सांगितल्याचं वृत्त आहे
लोकांचा संताप
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावरुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. "रुग्णांच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल आणि ऑपरेशन थीएटरमध्ये संसर्ग पसरवल्यास पाश्चात्य देशांमध्ये वैद्यकीय परवाने रद्द करतात. त्यामुळे हा जो काही प्रकार व्हिडीओमध्ये दिसतोय त्यासंदर्भात खटला दाखल करता येऊ शकतो. हल्ली प्रत्येक गल्लीत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमुळे या देशात डॉक्टरांचा दर्जा प्रचंड घसरला आहे आणि यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही," अशा शब्दांमध्ये एकाने संताप व्यक्त केला आहे. तर दुसऱ्याने, "पाकिस्तानात काहीही होऊ शकते. पाकिस्तानात घडणाऱ्या गोष्टींसंदर्भात मला कशाचेही आश्चर्य वाटत नाही," असा टोला लगावला आहे. तर अन्य एकाने, "व्हिडिओ रेकॉर्ड करून हसणाऱ्या मुलींना आधी शिक्षा व्हायला हवी. एका स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत नाजूक क्षणी असे हिडीस वर्तन बरे नाही," असा टोमणा मारला आहे. "सुशिक्षित डॉक्टरांमध्ये एवढी निरक्षरता आहे यावर विश्वास ठेवणं कठीण जातंय," असं म्हटलंय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.