भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामधील चौकशीसाठी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बोलवावं अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे. पत्रकारांशी चर्चा करताना राऊतांनी ही मागणी केली आहे. एवढ्यावरच न थांबता, "खरात हा सरकारचा माणूस असून त्याच्या पाठीशी 40 आमदार आहेत," असं म्हणत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
खरातचा मंत्रालयाच्या कामांमध्ये हस्ताक्षेप
"दीपक केसरकर यांना चौकशीसाठी बोलवा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चौकशीसाठी बोलवा. खासदार सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांची ही चौकशी करा. अमित शाहांपर्यंत अशोक खरात कसा पोहचला याची ही चौकशी करा," अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. अशोक खरात मंत्रालयातील अनेक मंत्र्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करत होता, असा दावाही राऊतांनी केला आहे. "एकनाथ शिंदे यांना अशोक खरातकडे नेणारे दीपक केसरकर होते," असंही राऊत म्हणालेत.
खरातच्या पाठीशी 40 आमदार
अशोक खरात हा भोंदू बाबा तर आहेच पण त्याच्या संपत्तीबाबत सरकारने उत्तर द्यायला पाहिजे. खरात सरकारचा माणूस आहे. त्याच्या पाठीशी 40 आमदार आहेत," असा टोला राऊतांनी लगावला.
जयंत पाटलांनी खरातच्या मंदिराला पाणी देणं चुकीचं
"महाविकास आघाडी सरकारमध्ये खरताच्या संस्थेच्या मंदिराला पाणी देणं चुकीचं आहे पण गुन्हा कधी झाला आहे? आता सरकार कोणाचं आहे? जयंत पाटील यांनी जर पाणी दिलं असेल तर का ते चुकीचं आहे. महत्वाचा मुद्दा हा आहे की महिलांचं शोषण झालं आहे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे," असं राऊतांनी म्हटलं आहे. "ट्रायडंट हॉटेलमध्ये शिक्षण विभागातील सर्व बदल्या आणि बडतर्फी अशोक खरातच्या नेतृत्वामध्ये होत होत्या," असा दावाही राऊतांनी केला आहे.
गुजरातवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
छगन भुजबळ म्हणतात की राज्यमध्ये गॅस टंचाई आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की सर्व काही बरं आहे. सर्वात पहिले लॉकडाउन होणार आहे गुजरातचा लोकांना माहित पडलं. मग गॅससाठी सर्वात मोठी रांग गुजरातला पहायला भेटत आहे. देवेंद्र फडणवीस यांना गुन्हा दाखल करायचा असेल तर गुजरातवर गुन्हा दाखल करा, कारण तिथूनच अफवा पसरवल्या जात आहेत.
आज संपतेय खरात कोठडी
अशोक खरातची पोलीस कोठडीची मुदत आज संपत असून त्याला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. आज न्यायालय या प्रकरणावर काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र न्यायालय पुन्हा पोलीस कोठडीची मुदत वाढवून देईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.