Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

35 दिवसांचा शट डाऊन जाहीर; 'या' कंपनीच्या पेट्रोल पंपमध्ये खडखडाट? भारतातील मोठी रिफायनरी का होतेय बंद?

35 दिवसांचा शट डाऊन जाहीर; 'या' कंपनीच्या पेट्रोल पंपमध्ये खडखडाट? भारतातील मोठी रिफायनरी का होतेय बंद?


इराण-इस्रायल- अमेरिका युद्धामुळे मध्यपूर्वेत तेल आणि गॅस पुरवठा अडकला आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी तेल रिफायनरी कंपनी नायरा एनर्जी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून सुमारे 35 दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे.

ही बातमी सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची आहे. कारण कंपनीचे देशभरात सात हजार पेट्रोल पंप आहेत आणि ती सरकारी तेल कंपन्यांनाही इंधन पुरवते. याचा कसा परिणाम होऊ शकतो? सविस्तर जाणून घेऊया.

नायरा एनर्जी ही कंपनी काय आहे?
नायरा एनर्जी ही गुजरातमधील वाडिनार येथे असलेली भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी तेल शुद्धीकरण रिफायनरी आहे. तिची वर्षाला 20 मिलियन टन तेल शुद्ध करण्याची क्षमता आहे. ही कंपनी रशियातील मोठी कंपनी रोसनेफ्टच्या मदतीने चालते. नायरा एनर्जी मुख्यतः घरगुती बाजारात पेट्रोल, डिझेल आणि गॅस विकते. तिच्या सात हजार पेट्रोल पंपांमधून सामान्य लोक रोज इंधन घेतात. सरकारी तेल कंपन्यांनाही ती पुरवठा करते. म्हणजे ही कंपनी बंद झाली तर देशातील इंधन पुरवठ्यात थेट परिणाम होऊ शकतो.
35 दिवस बंद का?

ही बंदी नियमित देखभाल (मेंटेनन्स) साठी असल्याचे कंपनीने सांगितलंय. गेल्यावर्षी युरोपियन कंपन्यांनी प्रतिबंधामुळे देखभालीसाठी लागणारे रसायन आणि कॅटलिस्ट पुरवण्यास नकार दिला होता. त्यामुळे काम पुढे ढकलावे लागले होते. आता कंपनीने सर्व तयारी पूर्ण केलीय. म्हणून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातून 35 दिवस कारखाना पूर्ण बंद ठेवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही बंदी युद्धाशी थेट संबंधित नसली तरी सध्याच्या परिस्थितीत ती अधिक गंभीर बनली आहे.

इराण युद्धाचा काय संबंध?
सध्या इराण-इस्रायल- अमेरिका युद्धामुळे होर्मुज जलडमरूमध्य बंद झाला आहे. जगातील 20 टक्के तेल आणि गॅस याच मार्गाने येते. इराणने तेलाच्या जहाजांना थांबवले आहे. त्यामुळे भारतासह जगभरात कच्चे तेल, गॅस आणि एलपीजी यांची कमतरता निर्माण झाली आहे. अशा वेळी नायरा एनर्जीची 35 दिवसांची बंदी ही अतिरिक्त धक्का आहे. देशातील एकूण रिफायनिंग क्षमतेत 8 टक्के घट होणार आहे. यामुळे इंधनाच्या किंमती वाढण्याची आणि पुरवठ्यात अडचण येण्याची भीती व्यक्त होत आहे.
सामान्य नागरिकांवर काय परिणाम?

कंपनी बंद राहिल्याने पेट्रोल, डिझेल आणि गॅसची उपलब्धता कमी होऊ शकते. नायरा एनर्जीचे सात हजार पेट्रोल पंप थेट प्रभावित होतील. सरकारी कंपन्यांनाही पुरवठा कमी होईल. यामुळे पेट्रोल पंपांवर रांगा लागण्याची, किंमती वाढण्याची आणि काही ठिकाणी कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः छोट्या शहरां आणि ग्रामीण भागात इंधन मिळणे कठीण होऊ शकते. तेल आणि गॅस संकट आधीच सुरू असताना ही बातमी नागरिकांसाठी चिंतेची आहे.

कंपनीने काय तयारी केलीय?
नायरा एनर्जीने सांगितले की त्यांनी बंदीच्या काळासाठी पुरेसा 'बफर स्टॉक' आणि राखीव साठा तयार केला आहे. म्हणजे त्यांच्या पेट्रोल पंपांवर इंधनाची कमतरता भासणार नाही आणि पुरवठा सुरळीत राहील. कंपनीने सर्व तयारी केल्याचे सांगितले आहे. तरीही सरकार आणि तज्ज्ञ युद्ध आणि बंदीचे एकत्रित परिणाम पाहत आहेत. ONGC सारख्या कंपन्या नवीन तेल शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण सध्यातरी सामान्य लोकांनी इंधनाचा वापर जपून करावा, असे सल्ले दिले जात आहेत. हे शट डाऊन 35 दिवसानंतर संपेल, पण युद्ध कधी संपेल याची शाश्वती नाही. त्यामुळे इंधनाच्या किंमती आणि उपलब्धतेवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.