महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्वात मोठ्या फेरबदलाच्या हालचाली : 37 केंद्रीय निरीक्षकांसह राज्यातील 183 दिग्गज नेत्यांची फौज मैदानात
काँग्रेस पक्षाने आता थेट बूथ स्तरावर 'सर्जिकल स्ट्राईक' करण्याची रणनीती आखली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानने महाराष्ट्रात धडक देत पक्ष संघटनेत व्यापक फेरबदलांची प्रक्रिया सुरू केली आहे. या मोहिमेमुळे चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जात आहे. ३७ केंद्रीय निरीक्षकांसह राज्यातील दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरली आहे. यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नाना पटोले, सतेज पाटील, माणिकराव ठाकरे, नसीम खान, अमित देशमुख, यशोमती ठाकूर आणि डॉ. नितीन राऊत यांसारख्या तब्बल १८३ नेत्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, हे नेते थेट जिल्हा पातळीवर जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करणार आहेत. या अभियानाचा सर्वात मोठा फटका सुस्त व निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बसण्याची चिन्हे आहेत. बूथपासून ते राज्य स्तरापर्यंत नियुक्त्या पारदर्शक पद्धतीने केल्या जाणार आहेत. यानंतर केवळ कर्तृत्व आणि कामगिरीच्या आधारावरच संधी दिली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.महिला आणि तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी देत संघटनेत नवचैतन्य आणण्यावर भर दिला जाणार आहे. गटबाजीला आळा घालणे, जबाबदाऱ्यांचे पारदर्शक वाटप करणे आणि समर्पित कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणून केडर बेस मजबूत करणे ही या मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. सत्ताधारी पक्षाच्या भक्कम निवडणूक यंत्रणेला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने सृजन हे नवे अस्त्र उचलले असल्याचे मानले जात आहे.जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांपासून ते बूथ कमिट्यांच्या रचनेपर्यंत आता थेट दिल्लीची नजर राहणार असल्याने स्थानिक पातळीवरील आपला माणूस संस्कृतीला आळा बसण्याची शक्यता आहे. मेरिटवर आधारित नेतृत्व उभे करण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचे प्रदेश काँग्रेस कमिटीने स्पष्ट केले आहे. हे हायटेक आणि लोकाभिमुख अभियान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.