मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ई-गव्हर्नन्ससाठी
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचा सन्मान
डिजीटल प्रशासनात सांगलीचा झेंडा :,जिल्हा परिषद, सांगली राज्यात दुसऱ्या स्थानी
सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी दीडशे दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या मूल्यमापनात 200 पैकी 195 गुणांसह सांगली जिल्हा परिषदेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांना आज प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
मुंबई येथील सह्याद्रि अतिथीगृहात 150 दिवस ई गव्हर्नन्स तसेच, सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपैकी सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आदि उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या महत्वाकांक्षी ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाची यशस्वी आणि प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल हा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र शासन आणि भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमांतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांचे ७ प्रमुख निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. यात कार्यालयाची अधिकृत वेबसाइट, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व तंत्रज्ञानाचा वापर या बाबींचा समावेश होता. या सर्वंकष मूल्यमापनात पुणे जिल्हा परिषद पहिल्या क्रमांकावर आली, तर सांगली जिल्हा परिषदेने 195 गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. ठाणे, नागपूर आणि नाशिक जिल्हा परिषदांनी अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक मिळविला.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रमोद काळे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांनी राबवलेल्या ई गव्हर्नन्स उपक्रमांमुळे नागरिकांना जलद, पारदर्शक व सुलभ पद्धतीने शासकीय सेवा उपलब्ध झाल्या. यामध्ये सेवा हक्क कायद्यांतर्गत सर्व १४ अधिसूचित सेवा १०० टक्के ऑनलाईन, ई-ऑफिस कार्यप्रणालीचा प्रभावी वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये लोकमित्र, बैठक सारांश प्रणाली आणि दस्तऐवज पडताळणी प्रणाली (डॉकचेन) सारख्या अनुप्रयोगांची निर्मिती, संवादयंत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सूचना अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांतून सांगली जिल्हा परिषदेने नागरिकांना लोकाभिमुख सेवा दिल्या.
सांगली जिल्हा परिषदेने कार्यालयीन कामकाजात अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत पारदर्शकता, गती आणि लोकाभिमुख सेवा देण्यात उल्लेखनीय प्रगती साधल्याची नोंद राज्यस्तरावर घेऊन आज हा गौरव करण्यात आला. या यशामुळे जिल्हा परिषद प्रशासनाला नवी ऊर्जा मिळाली आहे. भविष्यातही डिजिटल उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.