पुण्यात पुन्हा 'त्या' जीवघेण्या आजाराची एन्ट्री; 51 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, पुणेकरांनो आताच व्हा सावध
पुणे: गेल्या वर्षी पुणेकरांची झोप उडवणारा 'गुईलेन बॅरे सिंड्रोम' (GBS) हा दुर्मीळ आजार पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पुरंदर तालुक्यातील नीरा येथे या आजारामुळे 51 वर्षीय मन्सूर सय्यद यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या वर्षातील ‘जीबीएस’चा हा पहिलाच बळी ठरल्याने जिल्हा आरोग्य प्रशासन तातडीने ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे.
जीबीएस हा एक अत्यंत दुर्मीळ आणि मज्जासंस्थेवर परिणाम करणारा आजार आहे. यात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चुकून स्वतःच्याच मज्जातंतूंवर हल्ला करते. मन्सूर सय्यद यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आधीच त्रास होता. जीबीएसच्या लक्षणांमुळे त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि हृदयविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दिलासादायक बाब म्हणजे, नीरा येथीलच 46 वर्षीय कस्तुरी पटेल या महिलेने वेळेत उपचार घेतल्याने त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत.हा आजार संसर्गजन्य नसला, तरी तो बहुधा दूषित पाणी किंवा अन्नातून होणाऱ्या संसर्गामुळे उद्भवतो. नीरा परिसरात एकाचा मृत्यू आणि दुसऱ्या एका व्यक्तीत लक्षणे दिसून आल्याने प्रशासनाने तातडीने पाण्याचे नमुने गोळा करण्यास सुरुवात केली आहे. गावात घबराट पसरू नये म्हणून आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत.जीबीएसची लक्षणे सुरुवातीला साधी वाटू शकतात, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास काही तासांत अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो किंवा श्वसन संस्था निकामी होऊ शकते. गेल्या वर्षीही पुण्यात अनेकांना हा गंभीर आजार झाला होता. त्यामुळे यंदा सुरुवातीलाच सतर्क होणे गरजेचे आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
