स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात याची पोलीस कोठडी संपल्यानं त्याला आज पुन्हा एकदा नाशिकच्या कोर्टात हजर करण्यात आलं आहे. यावेळी सरकारी वकील खरातच्या काळ्या कारनाम्यांचा लेखाजोखा कोर्टासमोर मांडत आहेत. यामध्ये वकिलांनी अनेक धक्कादायक माहिती कोर्टाला दिली आहे. यामध्ये अशोक खरात यानं नरबळी दिला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी काही खळबळजनक माहिती समोर आणली आहे.
कोर्टात नेमकं काय घडलं?
अशोक खरात या भोंदूबाबानं अनेक बेकायदा काम केल्यानं तसंच लैंगिक शोषणाचे त्याच्यावर आरोप असल्यानं कोर्टात या खटल्यामध्ये नेमकी काय माहिती समोर येते? याची उत्सुकता असल्यानं वकिलांनी कोर्टात गर्दी केली होती. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांनी देखील कोर्टाच्या परिसरात मोठी गर्दी केली होती.
सरकारी वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?
अशोक खरात याच्यावर सध्या सहा गुन्हे दाखल आहेत. यानंतर आता त्याच्यावर हत्येचा गुन्हा देखील दाखल होण्याची शक्यता आहे. हा गुन्हा नरबळीच्यासंदर्भात असू शकतो, त्याचबरोबर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार नरबळीसाठी त्याच्यावर कलम वाढवलं जाऊ शकतं. अशोक खरात सध्या ६७ वर्षांचा असून त्यानं एका ३० वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचंही सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं. त्याचबरोबर मिरगाव इथल्या शंकराच्या मंदिरात अशोक खरात अनेक जादूटोण्याचे प्रकार करत होता, याच ठिकाणी त्यानं नरबळी दिल्याचा संशय सरकारी वकिलांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर अशा प्रकारच्या विशेष पुजेसाठी त्यानं विविध प्राण्यांच्या अवयवांचा वापर केल्याचीही माहिती मिळते आहे.
यामध्ये हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी तो लोकांना द्यायचा तसंच वाघाची कातडी आणि नागांचा वापर होत असल्याचं वकिलांनी कोर्टास समोर सांगितलं आहे. त्यामुळं वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत देखील गुन्हा अशोक खरातवर वाढवला जाऊ शकतो. या सर्व आरोपांच्या सखोल चौकशीसाठी अशोक खरातला आणखी पोलीस कोठडीची मागणी केली होती. याला खराच्या वकिलांनी आणखी पोलीस कोठडीची गरज नसल्याचं कोर्टासमोर सांगितलं पण महत्वाच्या गोष्टी आणखी बाहेर येणं बाकी असल्यानं कोर्टानं खरातला २९ मार्चपर्यंत पाच दिवसांनी पोलीस कोठडी वाढवून दिली.
खरातनं ५ नरबळी दिले
दरम्यान, आत्तापर्यंतचा खऱातचा सर्वात भयानक कारनामा म्हणजे त्यानं ५ नरबळी दिले असल्याचे पुरावे मिळाल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टासमोर सांगितलं आहे. खऱातनं आपल्या पिस्तुलाच्या माध्यमातून नरबळी दिला असल्याचा संशय वकिलांनी व्यक्त केला आहे. त्याच्या स्वतःच्या पिस्तुलाच्या गोळ्यांच्या ५ रिकाम्या पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत, त्यावरुन हा संशय व्यक्त केला गेला आहे. अशोक खरात हा स्वतःला सिद्धपुरुष म्हणवून घ्यायचा यातूनच त्याने अनेक महिलांची फसवणूक केली आहे.महिलांची त्यानं कशा पद्धतीनं फसवणूक केली याची माहिती देखील वकिलांनी कोर्टासमोर दिली. त्याचबरोबर खरातकडं काही प्रमाणपत्र देखील आढळून आली आहेत, याचा देखील तपास केला जात आहे. आपला कॉस्मॉलॉजीचा अर्थात ब्रह्मांडाचा अभ्यास होता असंही त्यानं अनेकांना सांगून फसवणूक केली आहे. हा भोंदूबाबा चिंचोके लाखो रुपयांना विकत होता त्याचबरोबर मधाच्या १ किलोची बाटली तो तब्बल ९ लाख रुपयांना विकत असल्याची माहिती सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.