"माझं कुटुंब हिंदू महार, आई मुस्लीम."; समीर वानखेडेंनी जातीच्या वादावर सोडलं मौन
समीर वानखेडे यांनी आपल्या जातीबद्दल आणि धर्माबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शाहरूख खानकडे लाच मागितल्याचा आरोप फेटाळतानाच, आपले कुटुंब पिढ्यानपिढ्या हिंदू महार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
समीर वानखेडे यांनी शुभंकर मिश्राला मुलाखत दिली. यावेळी शुभंकरने त्यांना "तुम्ही हिंदू आहात का?" असा थेट प्रश्न विचारला. त्यावर समीर वानखेडेंनी होकार दिला. जेव्हा मी पोस्ट केली की मी समीर वानखेडेंची मुलाखत घेतोय, तेव्हा बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या की त्यांना विचारा, ते एससी आहेत का? की खोटं प्रमाणपत्र बनवून त्यांनी नोकरी मिळवली? की ते मुस्लीम आहेत. समीर वानखेडेंनी लग्न केलं होतं? की निकाह केला होता? नवाब मलिक यांनी हे सर्व प्रश्न उपस्थित केले होते.
माझे कुटुंब हिंदू महार आहे- समीर वानखेडे
समीर वानखेडे या सर्व प्रश्नांची उत्तरं देत म्हणाले, "काही लोकांचा हेतू होता की माझ्या बाबतीत वेगळंच काहीतरी घडावं. पण आपल्या देशात अजूनही संविधान आहे. आपल्या देशात अजूनही तपास यंत्रणा आहेत. ऑगस्ट २०२२ मध्ये कास्ट क्रूनिटी कमिटीने माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले. माझे कुटुंब आधीपासूनच महार आहे. माझं अख्खं गाव आहे. माझं कुटुंब अनेक पिढ्यांपासून हिंदू महार आहे."
समीर वानखेडेंच्या आई-वडिलांनी केलेला प्रेमविवाह
"माझ्या वडिलांनी १९७८ साली प्रेमविवाह केला होता. माझी आई हरयाणा येथील मुरथल याठिकाणची होती. माझी आई मुस्लीम कुटुंबातील होती. त्यामुळे या सगळ्या गोष्टीत काही रॉकेट सायन्स नाही की माझा धर्म कोणता आहे. लोकांना कॉन्ट्रोव्हर्सी करायची होती, ती त्यांनी केली," असं स्पष्ट वक्तव्य समीर वानखेडे यांनी केलं.
लाच घेतल्याच्या आरोपांवर समीर वानखेडे काय म्हणाले?
समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडून लाच घेतल्याच्या आरोपांवरही उत्तर दिलं आहे. २०२१ मधील कॉर्डिलिया क्रुझ प्रकरणी शाहरुख खानकडे लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका केली होती. न्यायालयानेही याचिकेची दखल घेऊन सीबीआयांच्या संथ तपासावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच, तपास पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अजून तुम्हाला किती दिवस लागतील ? असा प्रश्न केला होता.मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे वानखेडे यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी, आर्यन खान याची सुटका करण्यासाठी अभिनेता शाहरूख खानशी आपण कधीही संपर्क साधलेला नव्हता. तसेच लाचेची मागणी केली नाही आणि घेतलीही नाही, असा दावा केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांच्यातर्फे करण्यात आला. मात्र सीबीआयचे वकील सुनावणीसाठी उपस्थित नसल्याने न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी मंगळवारी ठेवली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.