Big Breaking! अशोक खरातवर सरकारकडून पैशांची खैरात? पर्यटन खात्याचा 105 कोटींचा निधी मंदिरासाठी, विजय कुंभारांचा खळबळजनक दावा!
पुणे: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातने ज्या ठिकाणी विकृतीचा कळस गाठला, त्याचं बांधकाम हे सरकारी खर्चातून झालं असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे पर्यटनाचा निधी मंदिरासाठी दिल्याचा आरोप करत खरात सरकार पुरस्कृत बाबा आहे.
असा दावा आरटीआय ऍक्टिव्हिस्ट विजय कुंभारांनी केला आहे. नाशिकच्या मिरगावमधील श्री सिद्धेश्वर इशानेश्वर देवस्थानला 105 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पर्यटन विभागाने 31 मार्च 2018 ला हा निर्णय घेतला आणि त्या वर्षी 25 लाखांचा निधी देण्यात ही आला. हे काम मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने करायचं असं त्यात नमूद आहे, असा दावा करत कुंभारांनी पुरावे सादर केले आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी महिला आणि अल्पवयीन मुलींचं शोषण झालं, त्यासाठी सरकारने निधी पुरवला आहे, असा आरोप करत सरकार खरात वर कशी खैरात करत होतं, हे कुंभारांनी पुराव्यानिशी मांडण्याचा प्रयत्न केला.
गेली २५ वर्षे त्या बाबाला अनेकांनी सहकार्य केलं
एबीपी माझाशी बोलताना विजय कुंभार म्हणाले की, मी कालपासून म्हणतोय, हा बाबा सरकार पुरस्कृत बाबा आहे का अशी मला शंका येत आहे. त्याची कारणंही वेगळी आहेत, गेली २५ वर्षे त्या बाबाला अनेकांनी सहकार्य केलं आहे. अनेक मंत्री अधिकारी असतील ते मदत करत होते, पण आता जी माहिती पुढे येत आहे, ती पाहता सरकारनेच या गुन्ह्याला पाठिशी घातलं, या गुन्ह्यांना पाठिशी घातलं, असं म्हणता येईल, ३१ मार्च २०१८ मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून जिल्हा स्तरीय कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. ही मंजुरी पर्यटनस्थळांना मिळते, त्यावेळी कोण मंत्री होतं ते मला आत्ता पटकन सांगता येणार नाहीये, आताच ही माहिती मला मिळालेली आहे.
ज्या बाबांनी जिथे गुन्ह्यांची सुरुवात केली तिथे...
एक विषय आहे, पर्यटनासाठीचा निधी हा ईशान्येश्वर मंदिराच्या बांधकामासाठी वापरला आहे, अशोक खरातच्या मंदीरासाठी हा निधी वापरला आहे. नाशिक येथील श्री सिद्धेश्वर ईशान्येश्वर देवस्थान मिरगाव तालुका सिन्नर येथील विकास कामांना त्या काळात 105 कोटी रुपये निधी मंजूर झाला, त्यापैकी 25 लाख देण्यात आले होते, त्यामध्ये या मंदिराचा बांधकाम करण्यात आला आहे, हा सर्व सरकारी कारभार आहे खाजगी नाही, त्या ईशान्येश्वर मंदिरात सभामंडप बांधकाम 36 लाख रुपये, महिला पुरुष प्रसाधनगृह सात लाख 52 हजार, चेंजिंग रूम तेरा लाख छत्तीस हजार रुपये, शासनाने बनवून दिली, वाहनतळ 68 लाख, भक्तनिवास बारा लाख 53 हजार, लँडस्केपिंग आणि गार्डनिंग चार लाख 38 हजार, जीएसटी वगैरे वगैरे, ज्या बाबांनी जिथे गुन्ह्यांची सुरुवात केली, ज्या बाबाने गुन्ह्यासाठी मंदिर बांधली, त्या बाबाच्या मंदिराचं बांधकाम सरकारच्या पैशातून झालं आहे, याच्यापेक्षा जास्त या देशाचा या राज्याचं दुसरं दुर्दैव नाही, एपस्टीन फाईलमध्ये सरकार सहभागी आहे, असं मी कालपासून म्हणत होतो, ते सिद्ध करणारा आज हा पुरावा समोर आला आहे, आणि याचाच अर्थ शासनाचे त्यावेळचे जे कोणी मंत्री होते, तेव्हापासून या बाबाला शासकीय संरक्षण मिळत आहे, हे करणारे जे लोक आहेत या सगळ्यांना फासावर लटकवलं पाहिजे, हे त्या महिलांच्या अल्पवयीन मुलांच्या मुलींच्या, अपहरणामध्ये शोषणमध्ये हे सर्वजण जबाबदार आहेत, ही साधी आणि किरकोळ गोष्ट नाही, असही विजय कुंभार यांनी म्हटलं आहे.
अशोक खरातविरोधात 7 वा गुन्हा दाखल
अशोक खरातवर शिर्डीत आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खरातविरोधात काल पीडित तरुणीने एफआयआर दाखल केली आहे. अशोक खरातनं 4 वेळा बलात्कार केल्याची पीडित मुलीची तक्रार आहे. अशोक खरातनं गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने पोलिसांकडे केली आहे. वाच्यता केल्यास दैवी शक्तीने आई-वडिलांना मारुन टाकीन अशी धमकीही दिली. जुलै ते डिसेंबर 2024 दरम्यान अशोक खरातने चार वेळा बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने दाखल केली आहे. शेतात घर बांधण्यासाठी योग्य जागा सांगा, म्हणत पीडित तरुणीचे कुटुंब अशोक खरातकडे गेले होते. तिसऱ्या भेटीत मुलीनं कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, अशी विचारणा कुटुंबीयांकडून करण्यात आली. यावेळी पीडितेसोबत अशोक खरातने अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.