Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! :ओम बिर्ला यांचा अध्यक्षांच्या आसनावर न बसण्याचा निर्णय! लोकसभेत पहिल्यांदाच घडलं असं, सरकार-विरोधकांमध्ये घमासान

Big Breaking! :ओम बिर्ला यांचा अध्यक्षांच्या आसनावर न बसण्याचा निर्णय! लोकसभेत पहिल्यांदाच घडलं असं, सरकार-विरोधकांमध्ये घमासान

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला आजपासून गदारोळातच सुरूवात झाली. पहिल्या सत्रामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू दिले जात नाही, अध्यक्षांकडून सरकारला झुकते माप दिले जात असल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. त्यामुळे सभागृहाचे कामकाज सातत्याने तहकूब करावे लागत आहे. त्यातच दुसऱ्या सत्राच्या सुरूवातीलाच धक्कादायक बाब समोर आली आहे.

विरोधकांकडून अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती. अध्यक्षांनी ही नोटीस स्वीकारली आहे. त्यामुळे आज लोकसभा कामकाजाच्या अजेंड्यावर अविश्वास ठराव आला. ओम बिर्ला यांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच असे झाले. त्यानंतर बिर्ला यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

ठरावावर अंतिम फैसला होईपर्यंत अध्यक्षपदाच्या आसनावर न बसण्याचा निर्णय़ बिर्ला यांनी घेतला आहे. लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. त्यामुळे आज लोकसभेचे कामकाज सुरू करताना तालिका अध्यक्ष एन. के. प्रेमचंद्रन हे अध्यक्षांच्या आसनावर बसले होते. कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी इराण युध्दाचा मुद्दा काढत गॅस, इंधन तुटवड्यावर चर्चा करण्याची जोरदार मागणी केली. विरोधक आक्रमक झाल्याने सभागृहाचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधकांनी पुन्हा तोच मुद्दा उपस्थित केला. हातात फलक घेत विरोधक जोरदार घोषणाबाजी देत होते. या गदारोळातच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत आणि युध्दावर देशाच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिले. मात्र, त्यानंतरही विरोधकांचा गोंधळ थांबला नाही.

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यावेळी काँग्रेससह विरोधकांवर हल्ला चढविला. एक व्यक्ती, एक कुटुंब संपूर्ण भारत आहे का, या गोष्टीने देशाचे काय भले होणार आहे, असे सवाल त्यांनी केले. तुम्ही अध्यक्षांविरोधात आणलेल्या प्रस्तावावर चर्चा करायला आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधक शांत होत नसल्याने तालिका अध्यक्ष जगदंबिका पाल यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची लोकसभा अध्यक्षांविषयीचे जुने संदर्भ देत त्यांनी विरोधकांना शांत राहण्यास सांगितले. तसेच लोकसभा अध्यक्षांनी नैतिकतेच्या आधारे ठरावावर फैसला होईपर्यंत आसनावर न बसण्याचा निर्णय़ घेतला आहे. असे पहिल्यांदाच होत आहे. हे खूप मोठे आहे. त्यामुळे विरोधकांनी तुम्हीच आणलेल्या ठरावावर आधी चर्चा करावी, असे पाल यांच्याकडून सांगण्यात आले. पण विरोधक शांत होत नसल्याचे पाहून त्यांनी दुपारी तीन वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.