श्री. शरद पवारसाहेब राज्यसभेचे पुन्हा सदस्य झाले याचा व्यक्तिगत आनंदापेक्षाही संपूर्ण महाराष्ट्राचा आनंद अधिक मोठा आहे. शरद पवारसाहेबांच्या या सदस्यत्त्वाबद्दल ‘जळणाऱ्या लाकडाच्या वखारी’ बऱ्याच असल्या तरी, ते सर्व मित्र कोत्या मनाचे आहेत. या देशात पवारसाहेब हा एकमेव नेता असा आहे की, त्याची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक जाण आवाक्याच्या पलिकडची आहे. शिवाय राजकारणात राजकीय पक्ष असले तरी, राष्ट्रहिताचे अनेक विषय संसदेत असे असतात की, तिथे अनुभवाची गरज आहे. अशावेळी देशहिताचे निर्णय करण्यात पवारसाहेब यांची आज तिथे गरज आहे. मध्य एशियातील युद्धामुळे आणि अमेरिका उद्धात असल्यामुळे सगळे जग आज गवताच्या गंजीवर बसलेले अाहे. अमेरिका आज भारताचा मित्रराष्ट्र आहे, असे म्हणता येणार नाही, अशा स्थितीत वैचारिक भूमिका निरपेक्षपणे घेणाऱ्या नेत्याच्या गरज आहे. शरद पवारसाहेब गेले १० वर्षे सत्तेत नाहीत. तरीही त्यांचे राजकीय महत्त्व कोणालाही अमान्य करता येत नाही. मला असा नेता सांगा, जो १० वर्षे सत्तेत नाही.. पदावर नाही... मंत्री नाही... तरीही, ज्याच्या घरी रोज सकाळी १०० लोक भेटायला आलेले आहेत... हे सर्व लोक राजकीय नाहीत. पवारसाहेबांच्या आवाक्याची ज्यांना कल्पना आहे, त्यांना शेती, पाणी उद्योग, सिंचन, सहकार, राजकारण, कला, साहित्य, संगीत एकही विषय असा नाही, जो त्यांनी समजून घेतला नाही... किंवा समजून घेण्याची त्यांची इच्छा नाही.
त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्या-त्या विषयाला प्रतिष्ठा देणारे निर्णय घेतलेले आहेत. देशातील महिलांना महिला आयोगाची देणगी पवारसाहेबांची आहे. सगळ्या देशाला तो निर्णय मान्य करावा लागला. महिलांचे महत्त्व, शेतकऱ्यांचे महत्त्व, त्याच्या श्रमाचे महत्त्व या प्रत्येक विषयाची नेमकी जाण असलेला हा नेता आहे. त्यामुळे जे कोणी त्यांच्या ‘या वयातील’ राज्यसभेतील प्रवेशामुळे मनातून जळत आहेत. त्यांना हे स्पष्टपणे सांगितले पािहजे की, शरद पवार यांचे वय पाहू नका... त्यांच्या इच्छाशक्तीचे वय पहा... आज लोकसभा आणि राज्यसभेतील कोणत्याही व्यक्तिपेक्षा ‘सर्वांत तरुण इच्छाशक्तीचा नेता’ हे शरद पवारच आहेत. प्रश्नांची सर्वात जास्त जाण असणारा आणि आवाका असलेला हाच नेता आहे. देशाच्या आजच्या पंतप्रधानांनाही ‘मी त्यांचे बोट धरून राजकारण शिकलो,’ हे बारामतीत सांगावे लागलेले आहे. देशातील त्यावेळच्या पंतप्रधानांनी टोकियोहून ६१ व्या वाढदिवस समारंभाला येवून शरद पवार नेमके काय आहेत हे नेमक्या शब्दांत सांगितले की, ‘संसद में ७५० सांसद हैं... लेकीन शरद पवार अकेले है... जो मुझको बोले, मै भूकंपसे कैसा झूंजना जानता हँू... इसलिए मैं गुजरात जाना चाहता हँू’ इसलिए मैंने ऐसे नेता को डिजास्टर मॅनेजमेंट का अध्यक्ष बनाया. राजनितीसे उपर उठके देश के हितकी सोच जीनकी है... वाे शरद पवार है.... और इसलिए उनके ६१ वे जनमदिन समारोह के सत्कार को मैं आया हँू’
हे शब्द आहेत... स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे. ..
पंतप्रधान कसा असावा... हे वाजपेंनी देशाला दाखवून दिले. पवारसाहेबांची भावना त्यांना समजली होती. पवारसाहेब काय आहेत, हे मनमोहन सिंग यांना समजले होते... त्यांच्या आगोदर नरसिंहरावांना समजले होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पवारसाहेब सत्तेत असताना ते नेमके काय आहेत हे महाराष्ट्रातील विरोधी पक्षालाही समजले हाेते. म्हणूनच पवारसाहेबांच्या ५० व्या वाढदिवसाच्या अभिनंदनाचा ठराव महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांनी आणला. या देशात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, १० राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व विरोधी पक्षांचे दिग्गज नेते यांच्या उपस्थितीत ७५ वा वाढदिवस कोणत्या नेत्याचा साजरा झाला, त्या नेत्याचे नाव सांगा... ते नावही शरद पवार हेच आहे. तेव्हाही सांगण्यात आले होते की, ७५ हे निवृत्तीचे वय आहे... पण पवारसाहेब या सगळ्या सीमा ओलांडून पलिकडे गेलेले आहेत. त्यांच्या इच्छाशक्तीला, वैचारिक शक्तीला, निर्णय शक्तीला आणि त्यांच्यातील ऊर्जेचे वय वाळलेले नाही. ते कायम तरुण आहेत. आज देश विचित्र अवस्थेत आहे. अशावेळी ‘केवळ बहूमत’ हा एकच निकष देशाच्या हितासाठी नसतो. पडद्यामागचे अनेक मुद्दे असे असतात की, विरोधकांना विश्वासात घेवून देशाला अडचणीतून बाहेर काढावे लागते. आज आपण त्या अवस्थेत आहोत. अशावेळी ‘पवारसाहेब हे संसदेत असणे ही फार माेठी जमा आहे.’ त्यामुळे पवारसाहेबांवर कोणी कितीही टीका केली तरी त्यांचे तिथे जाणे आणि बिनविरोध जाणे, हा त्यांना तिथे सन्मानाने जाण्याचा मार्ग विचारपूर्वक घेण्यात आला. त्यातही पवारसाहेबांचे मोठेपण सर्वमान्य असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोणी, कशीही टीका केली तरी या कोत्या मनाच्या समाज माध्यमांकडे टीका करण्याशिवाय दुसरे काहीच नाही.
आणखी एक ‘सूचक’ घटना अशी की, पवारसाहेबांच्या राज्यसभेच्या अर्जावर सूचक म्हणून आर. आर. आबांचे सुपूत्र, तासगावचे आमदार रोहित पाटील यांची स्वाक्षरी आहे. आणि हा क्षण त्यांनी त्यांच्या हृदयात कोरून ठेवला आहे. त्यांच्या नेतृत्त्वात उद्याचा नेता दडलेला आहे.
पवारसाहेबांचे मन:पूर्वक १०० वेळा अभिनंदन....
२०३१ साली पवारसाहेबांची राज्यसभेची मुदत संपेल. त्या वर्षी पवारसाहेब ९१ वर्षांचे असतील. त्यांना १०० वर्षाचे आयुष्य मिळाे आणि तिथपर्यंत त्यांच्यातील ऊर्जा, इच्छाशक्ती, जिद्द याचे वयही ४० राहो... याच शुभेच्छांसह... आणि खरं सांगू पवारसाहेबांसारखे नेते घरात बसूच शकत नाहीत. ते बाहेर पडले तरच ही जिद्द आणि इच्छाशक्ती तरुण राहणार...📞9892033458
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.