'राजकीय शत्रू...', आदित्य ठाकरेंनी मोहित कंबोज यांच्या घरच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर राऊत स्पष्टच बोलले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युती केल्यानंतर सातत्याने भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेत निवडणुकांमध्ये त्यांच्याविरोधात एकत्र उतरत आहेत.
यामुळे भाजपाचे अनेक नेतेही ठाकरे बंधूंविरोधात सातत्याने टीका करत असतात. ठाकरेंशी राजकीय शत्रुत्व घेतलेल्या नेत्यांमध्ये भाजपा नेते मोहित कंबोजही आहेत. मात्र रविवारी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या मेजवानीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
"एखाद्याने शुभकार्याला, मंगलकार्याला बोलावलं असेल तर तेवढ्यापुरतं कटुता दूर ठेवून कोणी गेलं असेल तर त्याच्यावर अशा प्रकारे प्रश्न विचारणं मला काही योग्य वाटत नाही. ती काही राजकीय जागा नव्हती," असं संजय राऊत म्हणाले आहेत. पुढे त्यांनी म्हटलं की, "संघर्ष कधी संपत नाही, तो सुरुच राहणार. पण त्या कौटुंबिक कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. थोड्या वेळासाठी आदित्य ठाकरे उपस्थित होते असं मी वाचलं. अशा एखाद्या मंगलकार्यात कोणी बोलावलं असेल तर राजकीयदृष्ट्या पाहणं योग्य नाही", असं संजय राऊत म्हणाले आहेत.
"राजकीय शत्रू जरी असला तरी त्याच्याकडे मंगलकार्याचं आमंत्रण असलं तरी तेवढ्यापुरती कटुता दूर ठेवून जाणं महाराष्ट्राची संस्कृती आहे. हा राजकीय विषय नाही असं मी वारंवार सांगत आहे. विरोधकांच्या घरीही आम्ही अनेकदा कार्यासाठी गेलो आहोत. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार गेले होते. पण हे तेवढ्यापुरत असतं. वैचारिक संघर्ष थांबत नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमांना जाणार का?
एकनाथ शिंदेंनी निमंत्रण दिल्यानंतर तिथेही जाणार का? असं विचारलं असता ते म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांच्याकडे आता कोणतं शुभकार्य आहे असं दिसत नाही. त्यांची सर्व शुभकार्य पार पडली आहेत". तुम्ही राजकीयदृष्ट्या जवळ येताय का? असं विचारलं असता त्यांनी नकार दिला. "भाजपासोबतचा संघर्ष आम्ही नसून त्यांनीच सुरु केला आहे. 2014 पासून हा संघर्ष सुरु आहे. जसं की, इराणवर अमेरिकेने युद्ध लादलं आणि इराण लढत असून अमेरिकेला माघार घ्यावी लागत आहे. आम्ही त्या भूमिकेत आहोत".
'आमचे खासदार अजिबात फुटणार नाहीत'
"आमचे खासदार अजिबात फुटणार नाहीत. आमचे 9 खासदार असून पुढील निवडणूक येईपर्यंत 9 राहतील. खासदार फुटणार हे वृत्त विकृती आहे. हे पारदर्शक राजकारण नाही. देशात आणि महाराष्ट्रात ते राहिलेलं नाही. ऑपरेशन टायगर करणार, खासदार फुटणार या चर्चांपेक्षा तुमच्या खुर्चाखाली लागलेत ते सुरुंग पाहा. हे भाजपानेच लावले आहेत. त्यावर चिंतन केलं पाहिजे. शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे झेपावताना दिसेल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोण कोणाच्या संपर्कात आहे हा कधीही न संपणारा विषय आहे. राजकारणात प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात असतो असंही ते उपहासात्मकपणे म्हणाले.
फडणवीस यांनी केलेली ही तात्पुरती मलमपट्टी
साताराचे पोलीस अधिक्षक दिलीप दोशी यांच्यावरील कारवाईसंदर्भात ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी केलेली ही तात्पुरती मलमपट्टी आहे. त्यांना जे हवं होतं ते त्यांनी साध्य केलं. पालकमंत्री बदलले, जिल्हा परिषदेत आपली सत्ता आणली. समाधान कऱण्यासाठी रजेवर पाठवलं. एक महिना कुटुंबासोबत फिरुन या नंतर पाहू असं म्हटलं असेल.
ऑपरेशन तुतारी या चर्चा महाराष्ट्रात सुरुच राहणार आहेत. सत्ताधारी पक्षांना कोणताही कामधंदा नाही. चांगलं करावं, विकासाच्या दृष्टीने बोलावं, जनतेच्या प्रश्नांवर बोलावं असं काही दिसत नाही. आमची ऑपरेशन करता करता तुमचं कधी होईल कळणरा नाही असा इशाराही त्यांनी दिला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.