Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई महापालिकेवर 'महिला राज', आयुक्तपदी अश्विनी भिडेंची नियुक्ती

मुंबई महापालिकेवर 'महिला राज', आयुक्तपदी अश्विनी भिडेंची नियुक्ती


मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी मंगळवारी (ता. 31 मार्च) सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या पदावर नेमकी कोणाची नियुक्ती होते?

याबाबतची जोरदार चर्चा रंगली होती. मुंबई महापालिकेच्याआयुक्त पदासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे आणि नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांचे नाव चर्चेत होते. मात्र, आता महापालिकेच्या नव्या बॉस ठरल्या असून IAS अधिकारी अश्विनी भिडे यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अश्विनी भिडे या पहिला महिला आयुक्त ठरल्या आहेत.

मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये चुरस रंगल्याचे पाहायला मिळत होते. भूषण गगराणी यांच्या सेवानिवृत्तीनंतर महापालिकेचा कारभार कोणाच्या हाती सोपवला जाईल? याची जोरदार चर्चा रंगली होती. या पदासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आणि मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. मिलिंद म्हैसकर आणि नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांचे नाव चर्चेत होते. मात्र, अधिकारी अश्विनी भिडे यांनी बाजी मारली असून त्यांनी मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेवर महिला राज बघायला मिळणार आहे. कारण, काही महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीतील निकालानंतर भाजपने मुंबई महापालिकेवर महापौर म्हणून रितू तावडे यांनी निवड केली.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याच्या काही तास आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. साधारणतः अर्धा तास झालेल्या या चर्चेमध्ये आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानंतर अश्विनी भिडे यांनी नंदनवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यामुळे आता मंगळवारी (ता. 31 मार्च) अश्विनी भिडे या भूषण गगराणी यांच्याकडून मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारतील.

कोण आहेत अश्विनी भिडे?

अश्विनी भिडे या 1995 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून, त्यांनी आतापर्यंत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सध्या त्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत आणि मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारीही सांभाळत आहेत. त्यांच्या कामकाजाची दखल घेत त्यांना 'मेट्रो वूमन' म्हणून ओळख मिळाली आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या कार्याचे वेळोवेळी कौतुक केले आहे.

गगराणी मुदतवाढीसाठी होते प्रयत्नशील

दरम्यान, मुंबई महापालिका आयुक्तपदावरून 31 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त होत असलेले भूषण गगराणी हे मुदतवाढीसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा होती. मात्र, सेवा नियमानुसार मुख्य सचिव वगळता अन्य कुणालाही मुदतवाढ देता येत नाही. परंतु, 2012 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून तत्कालीन आयुक्त सुबोधकुमार यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. त्यामुळे 31 जानेवारी 2012 रोजी सेवानिवृत्त झालेल्या सुबोधकुमार यांना अधिकचे तीन महिने मिळाले होते. सुबोधकुमार यांच्या धर्तीवर गगराणी यांना मुदतवाढ हवी असल्याची चर्चा रंगली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.