अशोक खरात प्रकरणासारखी अनेक गंभीर प्रकरणे महाराष्ट्रात यापूर्वीही घडली आहेत. जिथे भोंदूगिरी, आध्यात्मिक गुरुत्वाचा मुखवटा किंवा राजकीय वरदहस्ताचा वापर करून महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.
अशोक खरात हे प्रकरण प्रामुख्याने नाशिक येथील असून, त्यात 'कॅप्टन' म्हणवून घेणाऱ्या या भोंदूबाबाजीवर अनेक महिलांवर बलात्कार, अमली पदार्थ देऊन व्हिडिओ शूट करणे आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.
रघुनाथ येवले
रघुनाथ येवले हे पुण्याचे एक प्रसिद्ध ज्योतिषी आणि राजकीय गुरू म्हणून ओळखले जात होते. त्यांचे अनेक बड्या राजकारण्यांशी जवळचे संबंध होते. पुण्यातील उद्योजक आणि राजकारणी गणेश गायकवाड यांनी त्यांच्या 27 वर्षीय पत्नीचा छळ केल्याचा आरोप होता. गायकवाड यांनी ज्योतिषी रघुनाथ येवले यांच्या सल्ल्यानुसार हा छळ केला होता. येवलने गायकवाड यांना सांगितले होते की, "तुझ्या पत्नीचा पायगुण चांगला नाही, तिच्यामुळे तू आमदार किंवा मंत्री होऊ शकणार नाहीस". पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पतीने तिला मंत्र-तंत्राच्या नावाखाली मारहाण केली आणि अनैसर्गिक अत्याचार केले. तसेच, तिला घराबाहेर काढण्यासाठी अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांनी रघुनाथ येवलेला जुलै 2021 मध्ये चतुःशृंगी पोलिस स्टेशन अंतर्गत अटक केली होती. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणाविरोधी कायदा' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रसाद दादा उर्फ बाबा
पुण्यातील प्रसाद दादा उर्फ बाबाचे संपूर्ण नाव हे प्रसाद भीमराव तामदार असं आहे. हे भोंदूगिरीचे प्रकरण जून 2025 मध्ये उघडकीस आले. स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या या 29 वर्षीय तरुणाने तंत्रज्ञानाचा वापर करून भक्तांचे आर्थिक आणि लैंगिक शोषण केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्रसाद तामदार भक्तांच्या मोबाईलमध्ये त्यांच्या नकळत 'AirDroid Kid' नावाचे गुप्त अॅप डाऊनलोड करायचा. या अॅपच्या माध्यमातून तो भक्तांचे कॉल्स, मेसेजेस, फोटो आणि त्यांचे लोकेशन यावर नजर ठेवायचा. इतकेच नाही तर तो रिमोटली त्यांचा मोबाईल कॅमेरा सुरू करून त्यांच्या खाजगी क्षणांचे चित्रीकरण करायचा. एका भक्ताचा मोबाईल वारंवार गरम (Overheat) होत असल्याने त्याने आपल्या सायबर तज्ज्ञ मित्राला तो दाखवला. तेव्हा मोबाईलमध्ये स्पाय अॅप असल्याचे आणि तो रिमोटली हाताळला जात असल्याचे समोर आले. तो भक्तांना मृत्यूची भीती दाखवून त्यांना वेश्यागमन किंवा अनैतिक शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा. तपासात तो समलैंगिक असल्याचे आणि त्याने अनेक पुरुष भक्तांचे लैंगिक शोषण केल्याचेही समोर आले आहे. तो भक्तांना गुंगीची औषधे देऊन त्यांच्यासोबत अश्लील चाळे करायचा. अनेक महिला भक्तांना अपत्यप्राप्तीचे आमिष दाखवून त्यांचेही शोषण केल्याचे आरोप आहेत. तो 'शुद्धीकरणाच्या' नावाखाली भक्तांना स्वतःच्या हाताने अंग घासून आंघोळ घालायचा, असे धक्कादायक प्रकारही उघड झाले आहेत.
आतिश पाटील
साताऱ्यातील 'गुरुआई' आतिश पाटील हे प्रकरण भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि फसवणुकीचे एक गंभीर उदाहरण आहे. आतिश पाटील याने स्वतःला 'गुरुआई' म्हणवून घेत साताऱ्यात आपले प्रस्थ निर्माण केले होते. तो भाविकांना त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी अघोरी पूजा आणि मंत्र-तंत्राचे उपाय सुचवायचा. व्यवसायात प्रगती करून देण्याचे किंवा संकटे दूर करण्याचे आमिष दाखवून त्याने अनेक भाविकांकडून लाखो रुपये उकळले होते. एका प्रकरणात त्याने आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी एका व्यापाऱ्याला मोठ्या रकमेची मागणी केली होती. जेव्हा भाविक पैसे देण्यास नकार द्यायचे, तेव्हा आतिश पाटील त्यांना "तुझे वाईट होईल" किंवा "तुझ्या कुटुंबावर संकट येईल" अशी भीती घालून आणि शाप देण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करायचा. याप्रकरणी सातारा पोलिसांनी आतिश पाटील विरुद्ध महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणाविरोधी कायदा (2013) आणि फसवणुकीच्या कलमांखाली गुन्हे दाखल केले होते. त्याच्या अटकेनंतर अनेक पीडित लोक समोर आले होते. अशाच प्रकारचे 'पाटील भोंदूबाबा' प्रकरण रत्नागिरीतही गाजले होते, जिथे महिलांच्या शोषणाचे आरोप झाले होते.
बाबा रहीम आणि आसाराम बापू
2013 मध्ये जोधपूर येथील आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. 2018 मध्ये जोधपूर न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर 2023 मध्ये गुजरातच्या गांधीनगर न्यायालयाने दुसऱ्या एका बलात्कार प्रकरणात त्यांना पुन्हा जन्मठेप सुनावली. आसाराम बापूंच्या दरबारात मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि बड्या पक्षांचे नेते हजेरी लावत असत. महाराष्ट्रातील अनेक शहरांत त्यांचे मोठे आश्रम आहेत, जिथे जमीन हडपल्याचेही आरोप झाले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असताना त्यांच्याविरोधात साक्ष देणाऱ्या अनेक साक्षीदारांवर हल्ले झाले किंवा संशयास्पद मृत्यू झाले, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले होते.
गुरमीत राम रहीम सिंग
हरियाणातील 'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख राम रहीमवर दोन साध्वींवर बलात्कार केल्याचा आणि एका पत्रकाराच्या हत्येचा आरोप होता. 2017 मध्ये सीबीआय न्यायालयाने त्याला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. नंतर पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या प्रकरणात त्याला जन्मठेप झाली. राम रहीमचा राजकीय प्रभाव इतका मोठा होता की, निवडणुकांच्या काळात अनेक बडे नेते त्याच्या डेऱ्यावर पाठिंबा मागण्यासाठी जात असत. त्याच्या अटकेनंतर हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता, ज्यात 30 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. त्याने स्वतःला 'मेसेंजर ऑफ गॉड' (MSG) म्हणवून घेत चित्रपट काढले होते आणि आपल्या आश्रमातील पुरुषांना नपुंसक केल्याचेही गंभीर आरोप त्याच्यावर सिद्ध झाले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.