Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"मी कुणावरही जबरदस्ती केली नाही, मा‍झ्या अंतर्मनाने..."; पोलीस कोठडीत अशोक खरातचं धक्कादायक विधान, तपासात नवे ट्विस्ट!

"मी कुणावरही जबरदस्ती केली नाही, मा‍झ्या अंतर्मनाने..."; पोलीस कोठडीत अशोक खरातचं धक्कादायक विधान, तपासात नवे ट्विस्ट!


नाशिक:  भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याने पोलीस कोठडीत तपासादरम्यान धक्कादायक विधान केले आहे. "मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही, हे सर्व माझ्या अंतर्मनाच्या आवाजाने घडले," असे त्याने स्पष्ट केले. नाशिक पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर खरात याची चौकशी सुरू असताना त्याने आपल्या कृत्यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला.

कोठडीत बसलेल्या खरात याचे वागणे पूर्णपणे विचित्र आहे. तो सतत मंत्रजप करत असतो आणि वारंवार पुटपुटत असतो, "आता पुढे मी कोणाचेही ऐकणार नाही, फक्त माझ्या मेंदूचे ऐकणार." त्याच्या या अस्वाभाविक वर्तनामुळे पोलीस यंत्रणा देखील आश्चर्यचकित झाली आहे. तपासादरम्यान तो उद्विग्न होऊन म्हणाला, "माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला. मी यांचे भले केले, तेच माझ्यावर उलटले." महिलांसोबत केलेल्या कृतींबाबतही त्याने असा दावा केला की, हे सर्व विधीचा एक भाग होते.

दरम्यान, खरात याच्या कार्यालयात SIT टीमने केलेल्या झाडाझडतीत अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. तंत्र-मंत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, तांब्याची बाटली, गंडेदोरे, काही महिलांचे केस, पूजा विधीचे साहित्य, प्लास्टिकचा वीस फुटी साप, महागड्या कस्तुरीच्या नावाने विक्रीसाठी बनवलेला कच्चा माल, अत्तराच्या बाटल्या, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे असे अनेक मुद्दे जप्त करण्यात आले आहेत.

खरात याच्यावर आता केवळ नाशिक पोलिसांचीच नव्हे तर केंद्रीय यंत्रणांचीही नजर आहे. तो ED, फॉरेक्स आणि कस्टम विभागाच्या रडारवर आला आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे ED कडे पाठवण्याची तयारी सुरू आहे. त्याच्या २१ देशांतील विदेश दौऱ्यांचा खर्च, विदेशी चलन व्यवहार आणि तुर्कस्थानसह अन्य देशांतून आणलेल्या साहित्यावर कस्टम ड्युटी भरली का, याची सखोल चौकशी होणार आहे.
केंद्रीय यंत्रणा सक्रिय

नाशिक आणि नगर जिल्ह्यात त्याच्या नावे ५२ मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बनावट खडे, रत्न आणि मध विक्रीतून मिळालेला पैसा देखील आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाच्या कक्षेत आला आहे. या सर्व प्रकरणामुळे अनेक केंद्रीय यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.

कोठडीतही मंत्रजप सुरू
खरात याने कोठडीतही मंत्रजप सुरू ठेवला असून, "माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला," असे वारंवार सांगत आहे. त्याच्या या विधानांमुळे संपूर्ण प्रकरण अधिक गहन आणि रहस्यमय बनले आहे. पोलीस आणि SIT टीम त्याच्या सर्व दाव्यांची सत्यता तपासत आहे. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.