नागपूर: केस गळतीमुळे त्रस्त असलेल्या आणि खासगी रुग्णालयांचा हजारो रुपयांचा खर्च न पेलवणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्राच्या वैद्यकीय इतिहासात पहिल्यांदाच नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) अत्यंत माफक दरात 'केस प्रत्यारोपण' सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
'मेयो'च्या त्वचारोग विभागाने हा पुढाकार घेतला आहे. आरोग्यसेवेच्या क्षेत्रात हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत केस गळणे, ही एक सामान्य पण गंभीर समस्या बनली आहे, ज्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर आणि आत्मविश्वासावर होतो. यावर 'केस प्रत्यारोपण' हाच सर्वात प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाय मानला जातो. 'मेयो 'मध्ये सुरू करण्यात आलेली ही नवी सेवा पूर्णपणे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दिली जात आहे.
'एफयुइ' तंत्रज्ञानाचा वापर
त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. धर्मेंद्र मिश्रा यांनी सांगितले, अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांच्या मार्गदर्शनात केस प्रत्यारोपण सुरू करण्यात आले. यासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था आहे. 'एफयुइ' या प्रगत आणि वेदनारहित तंत्रज्ञानाचा वापर केस प्रत्यारोपणासाठी केला जात आहे. मध्य भारतातील शासकीय रुग्णालयांमध्ये 'डर्मेटो सर्जरी' सुरू करणारेही 'नागपूर मेयो' हे पहिलेच रुग्णालय ठरले आहे.
सुरक्षितता अचूकतेला प्राधान्य
डॉ. मिश्रा यांनी या सुविधेबद्दल माहिती देताना सांगितले की, केस प्रत्यारोपणामध्ये रुग्णाची सुरक्षितता, स्वच्छता आणि अचूकता यांना विशेष महत्त्व दिले जात आहे.प्रशिक्षित डॉक्टरांची टीम आणि आधुनिक उपकरणांमुळे रुग्णांना उत्कृष्ट व समाधानकारक सेवा मिळत आहे. भविष्यात सोयीसुविधा जसजशा वाढतील, तसतशी रुग्णांची संख्याही वाढवली जाईल."आतापर्यंत चार रुग्णांवर यशस्वीपणे केस प्रत्यारोपण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयात हजारो रुपये खर्च लागणाऱ्या या सुविधेचा लाभ आता सामान्य रुग्णांनाही घेता येईल. भविष्यात अशा प्रकारच्या आधुनिक सुविधा अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत."- डॉ. रवी चव्हाण, अधिष्ठाता, मेयो
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.