देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली असताना धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना पाठविलेल्या एका अधिकृत पत्रावर चक्क भाजपचा शिक्का आढळून आला आहे. त्यामुळे देशात यावरून राजकीय घमासान सुरू झाले आहे. निवडणूक आयोगानेही ही टेक्निकल एरर असल्याचे सांगत चूक मान्य केली आहे.
निवडणूक आयोगाने १९ मार्च २०१९ रोजी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविलेले हे पत्र असून सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहे. याच पत्रावर केरळ भाजपचा शिक्का आहे. हे पत्र नुकतेच आयोगाने राजकीय पक्षांना पाठविले आहे. केरळमधील सीपीआयएम या पक्षाने सुरूवातीला हे पत्र सोशल मीडियात शेअर करत आयोगावर निशाणा साधला होता.
भाजपचा शिक्का असलेल्या या पत्रामुळे निवडणूक आयोगावर नामुष्की ओढविली आहे. हे पत्र व्हायरल होताच आयोगानेही खुलासा केला आहे. केरळच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सोशल मीडियात याबाबत स्पष्टीकरण देताना ही टेक्निकल एरर असल्याचे म्हटले आहे. ही चूक लक्षात आल्यानंतर तातडीने ती सुधारण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील या प्रकरणाशी संबंधित एका सहायक सेक्शन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकारी निलंबित असेल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. केरळ भाजपने नुकतीच एका जुन्या नियमांचा उल्लेख असलेली कागदपत्रे जमा केली होती. त्यावर भाजपचा शिक्का होता. तीच कागदपत्रे चुकून अन्य राजकीय पक्षांना पाठविण्यात आल्याचा खुलासा आयोगाने केला आहे.दरम्यान, या प्रकारामुळे विरोधी पक्षांच्या हाती आयते कोलित मिळाले आहे. काँग्रेसने यावरून आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. काँग्रेसने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ही चूक नसून संशयास्पद प्रकार आहे. या प्रकारामुळे घटनात्मक संस्थेची निष्पक्षता आणि विश्वसनीयतेवर गंभीर प्रश्न उपस्थित राहतात.
आयोगाच्या अधिकृत पत्रावर एखाद्या राजकीय पक्षाचा शिक्का कसा असू शकतो? निवडणूक आयोग भाजपच्या कठपुतलीप्रमाणे का वागत आहे? निवडणूक आयोग देशातील जनतेला याचे स्पष्टीकरण देऊ शकते का, असे सवाल काँग्रेसने उपस्थित केले आहे. त्याचप्रमाणे अन्य राजकीय पक्षांनीही हा मुद्दा उचलून धरत आयोगाला घेरले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.