Big Breaking!कोल्हापूर :- उमलणाऱ्या कळ्या खोडणारा डॉक्टर; एजंट ताब्यात, सोनोग्राफी मशीन, गोळ्या जप्त
बिद्री (ता. कागल) येथे मुख्य रस्त्यावरील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान करताना पोलिसांनी छापा टाकून डॉक्टरसह एका एजंटाला आज सायंकाळी ताब्यात घेतले. डॉ. युवराज विठ्ठल पाटील (वय ४५, रा. सोनाळी, ता. कागल) आणि एजंट संभाजी वसंत शिंदे (४०, रा. बोरीवडे, ता. कागल) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडील पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठीच्या गोळ्या, तसेच रोकड जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि इस्पूर्ली पोलिस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली. मुरगूड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी सांगितले, की गर्भलिंग निदान प्रकरणी पोलिस आणि आरोग्य विभाग संबधितांवर लक्ष ठेवून होते. त्यातूनच बिद्री येथील डॉ. सरदेसाई याच्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये यापूर्वीच्या गुन्ह्यातील डॉ. युवराज पाटील गर्भलिंग आणि गर्भपात करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आज सायंकाळी त्यांनी एका महिलेला तेथे गर्भलिंग निदान करण्यासाठी पाठविले. यासाठी डॉक्टरांची वेळ घेण्याचे काम आणि संबंधित ग्राहक आणण्याचे काम एजंट संभाजी शिंदे करीत असल्याचे दिसून आले. सायंकाळी तेथे शिंदेने गर्भलिंग करण्यासाठी २२ हजार रुपये घेतले. यानंतर पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने तेथे गर्भलिंग चाचणी होत असतानाच पोलिसांनी छापा टाकला.
पोलिसांनी तातडीने डॉ. युवराज पाटील याला ताब्यात घेतले. तेथील कंपौंडर आणि एजंट शिंदेलाही ताब्यात घेतले. पोर्टेबल सोनोग्राफी मशीन सील केले. प्राथमिक पंचनाम्यात गर्भपातासाठी वापरात असलेल्या गोळ्याचे कीटही मिळाले. त्यामुळे येथे गर्भपात ही होत असल्याचा संशय पोलिसांना आला आहे. बिद्री-गारगोटीच्या मुख्य रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ श्रद्धा वुमेन्स ॲण्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. दुमजली हॉस्पिटलमध्ये खुलेआम गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याचे आता छाप्यानंतर दिसून आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ, सुरेश पाटील, विनोद कांबळे, इस्पूर्ली पोलिस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक क्रांती पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
रजिस्ट्रर जप्त
गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये असल्याचे छाप्यात दिसून आले. तेथे जप्त केलेल्या रजिस्टरमध्ये जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील रुग्णांची सुद्धा काही नावे दिसून आली आहेत. काहींनी येथे गर्भपात केल्याचीही माहिती छाप्यानंतर पथकाला मिळाली आहे. त्या संदर्भातील सारे तपशील या रजिस्टरमध्ये असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.यापूर्वी दोन वेळा डॉ. युवराज पाटीलवर अशाच गुन्ह्यात संशयित म्हणून कारवाई झाली आहे. तरीही त्याचे कारनामे अजूनही सुरू असल्याचे आजच्या छाप्यातून स्पष्ट झाले. त्याच्यावर पहिल्यांदा कारवाई झाल्यावर त्याची 'बीएचएमएस' ही सनद निलंबित केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतरही तो वैद्यकीय व्यवसाय करतो. त्यासाठी तो श्रद्धा हॉस्पिटलचा वापर करतो. श्रद्धा हॉस्पिटलच्या फलकावर डॉ. श्रद्धा युवराज पाटील असेही एक नाव आहे. हे हॉस्पिटल डॉ. सरदेसाई यांचे असल्यामुळे तेही सहआरोपी होऊ शकतात, असेही पोलिसांनी सांगितले.
औषध विक्रेताही रडारवर
गर्भपाताच्या गोळ्या (किट) ठरावीक डॉक्टरांनाच ठेवण्याची परवानगी असते. तसेच विक्रीची नोंद ठेवावी लागले. हॉस्पिटल परिसरातील औषध विक्री दुकानातून अशी काही विक्री झाली आहे काय, याचाही तपास पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
बावीस हजारांत गर्भलिंग निदान
एजंट आणि कंपाउंडर म्हणून संभाजी शिंदे काम करतो. तो ग्राहक आणतो. आजच्या गर्भलिंग निदानासाठी त्याने २२ हजार रुपये घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. गर्भलिंग निदानाचा दर वेगळा असून तो साधारण पाऊण लाखांपर्यंत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. शिंदेकडील मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून त्याच्यातील डेटानुसार त्याच्याशी कोण कोण संपर्कात आहे, वरदहस्त कोणाचा आहे, याची माहिती पुढे येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.