Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली: उन्हाची तीव्रता वाढल्याने शाळा सकाळ सत्रात

सांगली: उन्हाची तीव्रता वाढल्याने शाळा सकाळ सत्रात



सांगली : शिवरात्रीनंतर दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढत असून जिल्हा परिषदेच्या शाळा सोमवारपासून सकाळ सत्रात सुरू करण्यात आल्या. उन्हाची तीव्रता दुपारी वाढत असल्याने सायंकाळपर्यंत रस्त्यावरची वाहनांची वर्दळ कमी होत असून उष्म्याघाताचे रूग्ण आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात कक्ष सुरू करण्यात आले आहेत. शिवरात्रीनंतर सांगलीसह जिल्ह्यात उष्मा वाढत आहे. दिवसाचे तपमान ३७ अंशापर्यंत पोहचू लागल्याने तीव्रता अधिक जाणवत आहे. सकाळी आठ वाजलेपासूनच उन्हाची तीव्रता अधिक भासत असल्याने याचा दैनंदिन कामावर परिणाम होउ लागला आहे.

उन्हाची तीव्रता वाढत असल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १ हजार ६८२ प्राथमिक शाळांतील शालेय कामकाज सकाळ सत्रात आजपासून सुरू करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली. सकाळी सात ते ११.४५ वाजेपर्यंत शैक्षणिक सत्र सुरू राहणार आहे. पुढील महिन्यात वार्षिक परीक्षेचे कामकाज आटोपून १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केल्यानंतर २ मे पासून शाळांना उन्हाळी सुट्टी राहणार आहे. पुढील शैक्षणिक सत्र १६ जूनपासून सुरू होणार आहे.

दरम्यान, वाढत्या उन्हामुळे शहरातील बाजारपेठामध्ये दुपारी बारानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत वर्दळ कमी झाली आहे. दुपारच्या उन्हाच्या तीव्रतेमध्ये रस्त्यावरील वाहनांची वर्दळही कमी झाली असून नेहमी रहदारीने वाहते असलेले रस्तेही दुपारी ओस पडू लागले आहेत. शीतपेय, रसवंती गृह आणि सरबत विक्री करणार्‍या केंद्रावर शीतलता मिळवण्यासाठी लोकांची गर्दी होउ लागली आहे. रस्त्याकडेला कलिंगड, नारळ पाणी विक्रेतेही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. 

सांगलीतील गणेशमंदिरामागे समर्थ घाटाजवळ माठ विक्रेत्यांच्या दुकानात थंड पाण्यासाठी डेरे खरेदेीसाठीही नागरिकांची वर्दळ वाढली आहे. ग्रामीण भागात शेतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून शेतमजूरही एका सत्रात म्हणजे सकाळी सात ते दुपारी बारा या वेळेतच काम करत आहेत. महापालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्रासह प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघाताचे रूग्ण आल्यास तात्काळ उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले असून या ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.