आई म्हणाली, पुढच्या जन्मी पुन्हा माझाच मुलगा हो..!गाझियाबादमध्ये १३ वर्षांच्या वेदनांनंतर हरीश राणाला अखेर मुक्ती..!
१३ वर्षे मृत्यू आणि जीवनाच्या सीमारेषेवर झुंज देणाऱ्या हरीश राणा याच्या संघर्षाचा अखेर भावनिक शेवट झाला. कोमामध्ये अडकलेल्या या ३२ वर्षीय तरुणाला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 'पॅसिव्ह युथेनेशिया' म्हणजेच सन्मानपूर्वक मृत्यूची परवानगी दिल्यानंतर अखेर वेदनांतून मुक्ती मिळाली. मात्र या निर्णयामागे एका आई-वडिलांचे असह्य दुःख, आशेचा लांबलेला प्रवास आणि मन हेलावून टाकणारी भावनिक कहाणी दडलेली आहे.
स्वप्नांनी भरलेलं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त..
हरीश राणा हा आपल्या आई-वडिलांचा लाडका मुलगा होता. शिक्षण घेऊन मोठा अभियंता व्हावा, घराला आधार द्यावा अशी त्यांच्याबद्दलची पालकांची स्वप्ने होती. पण २०१३ मध्ये झालेल्या एका गंभीर अपघाताने हे सर्व स्वप्न क्षणात उद्ध्वस्त झाले. मेंदूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे हरीश कोमामध्ये गेले आणि त्यानंतर तब्बल १३ वर्षे ते अचेतन अवस्थेत राहिले. रुग्णालयातील बेड, जीवनरक्षक यंत्रणा आणि उपचारांची अखंड साखळी इतकाच त्यांच्या आयुष्याचा उरलेला प्रवास बनला होता.
उपचारांची धडपड, आशेचा लांबलेला प्रवास..
कुटुंबीयांनी हरीश यांच्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. अनेक डॉक्टर, विविध उपचारपद्धती आणि वैद्यकीय सल्ले यांचा आधार घेत कुटुंबाने आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. पण वर्षानुवर्षे उलटूनही त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर मुलाच्या असह्य अवस्थेकडे पाहत पालकांनी एक अत्यंत वेदनादायी निर्णय घेतला तो म्हणजे स्वतःच्या मुलासाठी इच्छामृत्यूची परवानगी मागण्याचा.
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय..
दीर्घ सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने 'पॅसिव्ह युथेनेशिया'ला परवानगी देत सन्मानपूर्वक मृत्यूचा अधिकार मान्य केला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर वैद्यकीय प्रक्रियेनुसार हरीश यांच्यावर चालू असलेली जीवनरक्षक यंत्रणा हटवण्यात आली. याच क्षणी १३ वर्षे चाललेली वेदनांची झुंज अखेर संपली.
आईच्या शब्दांनी सगळेच सुन्न..
हरीश यांना अखेरचा निरोप देताना वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. मुलाकडे पाहत त्यांच्या आईच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या ‘बाळा… पुढच्या जन्मी पुन्हा माझाच मुलगा हो.’ आईच्या या शब्दांनी उपस्थित प्रत्येकाचे मन सुन्न झाले. त्या क्षणी उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. कारण हा केवळ एका तरुणाचा निरोप नव्हता, तर १३ वर्षांच्या वेदनांचा, संघर्षाचा आणि एका कुटुंबाच्या असह्य यातनांचा शेवट होता.
समाजाला विचार करायला लावणारी घटना..
हरीश राणा यांची कहाणी केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही. ती मानवी वेदना, वैद्यकीय नैतिकता आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकारावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना आहे. इच्छामृत्यूबाबत देशात आधीपासूनच चर्चा सुरू होती, मात्र या प्रकरणामुळे त्या चर्चेला नव्याने धार मिळाली आहे. आज अनेकांच्या प्रार्थना एकाच दिशेने आहेत, १३ वर्षे वेदनांमध्ये अडकलेल्या हरीश राणा यांच्या आत्म्यास अखेर शांतता लाभो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.