Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

२५ वर्षीय तरुणीला मिळाली दयामरणाची परवानगी; वडिलांविरोधातच जिंकली कायदेशीर लढाई, प्रकरण काय?

२५ वर्षीय तरुणीला मिळाली दयामरणाची परवानगी; वडिलांविरोधातच जिंकली कायदेशीर लढाई, प्रकरण काय?


शारीरिक आणि मानसिक वेदनांशी अनेक वर्षे झुंज देणाऱ्या २५ वर्षीय स्पॅनिश तरुणीच्या आयुष्याचा प्रवास अखेर गुरुवारी (२६ मार्च) संपला. नोएलिया कॅस्टिलो असे या तरुणीने नाव असून तिने केलेली दयामरणाची मागणी स्पेनच्या न्यायालयाने जड अंतःकरणाने मान्य केली.

२०१५ मध्ये सामूहिक बलात्काराच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागल्यानंतर नोएलिया प्रचंड मानसिक तणावाखाली होती. या वेदनांतून मुक्त होण्यासाठी तिने न्यायालयात याचिका दाखल करून दयामरणाची मागणी केली होती. नोएलियाचे वडील जेरोनिमो कॅस्टिलो यांनी तिच्या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. मुलीला दयामरणाची देऊ नये यासाठी त्यांनी न्यायालयात धावही घेतली होती. अखेर वडिलांविरोधातच कायदेशीर लढा जिंकून नोएलियानेदयामरणाच्या माध्यमातून मृत्यूला कवटाळले, त्याविषयीचा हा आढावा…

२५ वर्षीय नोएलियाची वेदनादायी कहाणी
स्पेनमधील बार्सिलोना शहरात राहणाऱ्या नोएलियाच्या आयुष्याचा प्रवास अत्यंत वेदनादायी आणि संघर्षाने भरलेला होता. दोनदा झालेला बलात्कार आणि त्यानंतर आलेल्या अपंगत्वाच्या वेदना सोसणाऱ्या नोएलियाने अखेर दयामरणाची मार्ग स्वीकारला. ‘स्काय न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, वयाच्या १३ व्या वर्षीपासूनच नोएलिया मनोरुग्ण तज्ज्ञांकडून उपचार घेत होती. त्याच काळात तिच्या आई-वडिलांचाही घटस्फोट झाला होता. २०२१ मध्ये प्रियकराने लग्नाचे वचन देऊन नोएलियाचे वारंवार लैंगिक शोषण केले. त्यानंतर २०२२ मध्ये प्रियकराच्या तीन मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर नोएलिया प्रचंड तणावाखाली गेली आणि तिने राहत्या घराच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असे न्यायालयीन नोंदींमध्ये नमूद आहे.

नोएलियाला कायमस्वरूपी आले होते अपंगत्व

आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर कुटुंबीयांनी नोएलियाला तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून तिचा जीव वाचवला, पण गंभीर दुखापतीमुळे नोएलियाचा कंबरेखालचा भाग पूर्णपणे निकामी (पॅरालाइज्ड) झाला. वैद्यकीय अहवालानुसार, नोएलियाला अनेक दिवसांपासून असह्य वेदना होत होत्या आणि तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता नव्हती. या अवस्थेत २५ वर्षीय तरुणी कॅस्टिलो बार्सिलोना येथील एका केअर होममध्ये रहात होती. याच शारीरिक आणि मानसिक यातनांमधून मुक्त होण्यासाठी तिने कायदेशीररित्या दयामरणाची मागणी केली होती. नोएलियाने एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या घटनेचा उल्लेख तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा ‘टर्निंग पॉईंट’ म्हणून केला होता.

नोएलिया मुलाखतीत काय म्हणाली होती?
नोएलियाने स्पॅनिश टीव्हीला दिलेल्या एकमेव मुलाखतीत आपल्या वेदनादायक अवस्थेबद्दल आणि दयामरणाची निर्णयाबद्दल स्पष्टपणे भूमिका मांडली होती. ही मुलाखत तिच्या आजीच्या घरी रेकॉर्ड करण्यात आली होती. मला आता शांततेत मरायचे आहे आणि ही वेदना थांबवायची आहे. मी माझ्या निर्णयाबाबत पूर्णपणे ठाम आहे. माझ्या कुटुंबातील कोणीही दयामरणाची बाजूने नाही, पण मी इतकी वर्षे सहन केलेल्या वेदनांचे काय? असा प्रश्न तिने उपस्थित केला होता. आई-वडील आणि कुटुंबीयांचा आनंद हा मुलीच्या वेदनांपेक्षा मोठा असूच शकत नाही. मला आता एकटे वाटत असून संपूर्ण जग अंधकारमय दिसत आहे. अपंगत्व आल्यामुळे तीव्र पाठदुखी आणि वेदनांचा सामना करावा लागत असून त्यामुळे झोपही येणे कठीण झाले आहे, असे तिने सांगितले होते. नोएलाने तिच्या मृत्यूबाबतही काही वैयक्तिक इच्छा व्यक्त केल्या होत्या. मला मरतानाही सुंदर दिसायचे आहे, असे म्हणत तिने चांगला ड्रेस परिधान करण्यासह मेकअपची इच्छा व्यक्त केली होती. तिने निरोप घेण्यासाठी कुटुंबीयांना बोलावून घेतले होते; मात्र मृत्यूच्या क्षणी आपल्या खोलीत एकटी राहण्याची तिची इच्छा होती.

नोएलियाच्या आई-वडिलांची भूमिका काय होती?

नोएलियाने आपल्या मृत्यूच्या वेळी सोबत ठेवण्यासाठी चार विशेष छायाचित्रे निवडली होती. त्यामध्ये आईचे चित्र काढतानाचा फोटो, लहानपणीच्या पाळीव कुत्र्याचा फोटो, शाळेच्या पहिल्या दिवसाचा फोटो आणि बालपणातील एक आनंदी क्षण दर्शवणाऱ्या फोटोचा समावेश होता. ऑक्टोबर २०२२ मध्ये नोएलियाच्या वडिलांनी तिच्या आत्महत्येच्या प्रयत्नाला प्रत्यक्ष पाहिले होते. त्याबद्दल मुलाखतीत नोएला म्हणाली की, माझ्या वडिलांनी मला इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडताना पाहिले; पण ते काहीच करू शकले नाहीत. मात्र त्यांनी जे काही केले आहे, त्यानंतर आता मला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटत नाही. वडिलांनी माझ्या दयामरणाची निर्णयाचा कधीच आदर केला नाही आणि ते करणारही नाहीत. यादरम्यान माझ्या मुलीने तिचा निर्णय बदलल्यास मी आयुष्यभर तिचा सांभाळ करेन, असे नोएलियाच्या आईने स्पॅनिश प्रसारमाध्यमांना सांगितले होते.

कशी मिळाली दयामरणाची परवानगी?
२०२३ मध्ये नोएलियाने न्यायालयात याचिका दाखल करून दयामरणाची विनंती केली होती. युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर जुलै २०२४ मध्ये न्यायालयाने तिची विनंती मान्य केली होती. २ ऑगस्ट २०२४ रोजी नोएलियाच्या दयामरणाची प्रक्रिया पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले होते; परंतु तिच्या आई-वडिलांनी कायदेशीर आक्षेप घेतल्यामुळे ही प्रक्रिया रोखली गेली आणि त्यानंतर पुन्हा या प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीला सुरुवात झाली. नोएलियाचे वडील जेरोनिमो कॅस्टिलो यांना अत्यंत पुराणमतवादी ख्रिश्चन वकिली गटांनी पाठिंबा दिला होता. नोएलियाला असलेल्या मानसिक आजारामुळे ती स्वतःच्या मृत्यूचा निर्णय घेण्यास सक्षम नाही, असा दावा त्यांनी न्यायालयात केला. फेब्रुवारी २०२६ मध्ये न्यायालयाने जेरोनिमो यांचा युक्तिवाद फेटाळून लावला आणि नोएलियाची दयामरणाची विनंती मान्य केली.
नोएलियाच्या वडिलांची युरोपियन न्यायालयात धाव

स्पेनमधील सर्व मार्ग बंद झाल्यानंतर जेरोनिमो यांनी ‘युरोपियन कोर्ट ऑफ ह्युमन राइट्स’ (मानवाधिकार न्यायालयात) मध्ये धाव घेतली. आपल्या मुलीचे दयामरण थांबवण्यासाठी त्यांनी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, १० मार्च २०२६ रोजी युरोपियन न्यायालयानेही त्यांची ही मागणी फेटाळून लावली. नोएलियाच्या दयामरणाच्या ठरलेल्या तारखेच्या अवघ्या एक दिवस आधी म्हणजेच २५ मार्च २०२६ रोजी जेरोनिमो यांच्या वकिलांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी नोएलियाच्या वैद्यकीय पथकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही प्रक्रिया तातडीने रोखण्याची विनंती केली. मात्र, न्यायाधीशांनी त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावला. अखेर सर्व कायदेशीर अडथळे पार केल्यानंतर गुरुवारी, २६ मार्च २०२६ रोजी नोएलियाची सन्मानाने दयामरणाची इच्छा पूर्ण झाली.

स्पेनचा इच्छामरणाचा कायदा काय सांगतो?
स्पेनमध्ये २०२१ पासून इच्छामरणाचा कायदा लागू करण्यात आला आहे. स्पेनच्या आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, जून २०२१ ते २०२४ च्या अखेरपर्यंत तब्बल १,१२३ व्यक्तींनी या कायद्यांतर्गत आपले जीवन संपवले आहे. मात्र, नोएलिया कॅस्टिलो हिच्या इच्छामरणाला परवानगी देण्यात येऊ नये यासाठी न्यायालयात पहिल्यांदाच प्रकरण दाखल झाले होते. स्पेनच्या कायद्यानुसार, इच्छामरणाचा अर्ज करणारा व्यक्ती सज्ञान असणे आवश्यक आहे. त्याशिवाय अर्जदाराला इच्छामरणाच्या मागणीसाठी कारणेही देणे अनिवार्य आहे. गंभीर आजार आणि कायमस्वरूपी अपंगत्व आलेले लोक या कायद्यानुसार अर्ज करू शकतात. इच्छामरणासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला दोन वेळा लेखी स्वरूपातील माहिती द्यावी लागते. या कायद्यानुसार इच्छामरणाच्या दोन पद्धतींना परवानगी आहे. त्यातील पहिली पद्धत अधिकृत आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत अर्जदाराला प्राणघातक डोस देणे, तर दुसरी पद्धत स्वतःचे आयुष्य संपवण्यासाठी त्याला प्राणघातक औषधे लिहून देण्याची आहे. नोएलियाने यातील पहिल्या पद्धतीचे इच्छामरण स्वीकारल्याचे सांगितले जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.