Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माझ्या भावाला फोन करायची हिंमतच कशी झाली?; सरन्यायाधीश भडकले, सुप्रीम कोर्टात वातावरण तापलं

माझ्या भावाला फोन करायची हिंमतच कशी झाली?; सरन्यायाधीश भडकले, सुप्रीम कोर्टात वातावरण तापलं


नवी दिल्ली:  एका प्रकरणाशी निगडित आदेशावरून आलेल्या फोननंतर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत चांगलेच संतापले. सरन्यायाधीशांकडून देण्यात आलेल्या आदेशावरून त्यांच्या भावाला फोन केल्याबद्दल त्यांनी कोर्टात तीव्र नाराजी व्यक्त केली.
तुमच्या पक्षकाराविरुद्ध अवमान कारवाई का सुरू करू नये? सरन्यायाधीशांनी हा आदेश कसा दिला, हे माझ्या भावाला फोन करून विचारण्याची त्यांची हिंमतच कशी झाली? तो मला काही निर्देश देतोय का? असे कडक ताशेरे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी ओढले.
संतापलेले सरन्यायाधीश म्हणाले की, तुम्ही या गोष्टीची पुष्टी करा आणि त्यानंतर एक वकील म्हणून सर्वात आधी तुम्ही या खटल्यातून हटले पाहिजे. भलेही ते भारताबाहेर लपले असतील. अशा लोकांशी कसे वागावे हे मला माहीत आहे. यापुढे असं करण्याचं धाडस कधीही करू नका. मी गेल्या २३ वर्षांपासून अशा लोकांशी व्यवहार करत आलोय. न्यायपालिकेच्या कामकाजात कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही असं त्यांनी खडसावून सांगितले.

काय आहे प्रकरण?
हे प्रकरण हरियाणातील दोन विद्यार्थ्यांशी संबंधित आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी बौद्ध अल्पसंख्याक कोट्याअंतर्गत उत्तर प्रदेशातील सुभारती वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याचा दावा केला आणि पुरावा म्हणून प्रमाणपत्रे सादर केली, परंतु वैद्यकीय महाविद्यालयातील आरक्षणाचा लाभ घेण्यासाठीच हे धर्मांतर केले असावे असा संशय कोर्टाला आला. हे विद्यार्थी 'पुनिया' जातीचे होते, जी जात सामान्यतः सर्वसाधारण प्रवर्गात येते असं सरन्यायाधीशांना आढळून आले त्यामुळे कोर्टाने याला आरक्षणाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न म्हटलं. खटल्यावेळी जेव्हा याचिकाकर्त्यांच्या वडिलांनी अयोग्य वर्तन केल्याचे किंवा अवाजवी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले तेव्हा त्यांच्या वकिलाने कोर्टाची माफी मागितली. आपल्याला याबद्दल माहिती नव्हती असं वकिलाने कोर्टात सांगितले.
हा फसवणुकीचा प्रकार - सरन्यायाधीश

हरियाणाच्या अधिकाऱ्यांवरही प्रभाव टाकण्याचे प्रयत्न होत असल्याचे कोर्टाने गंभीर निरीक्षण नोंदवले. सरन्यायाधीशांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. कोर्टाने हरियाणाच्या मुख्य सचिवांना अल्पसंख्याक प्रमाणपत्रे जारी करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे निर्देश दिले. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी याला फसवणुकीचा एक प्रकार असल्याचं म्हटलं. त्यानंतर कोर्टाने भाऊ-बहिणीची याचिका फेटाळून लावली. "तुम्हाला अल्पसंख्याकांचे हक्क काढून घ्यायचे आहेत. तुम्ही उच्च जातीचे आहात. तुमच्या क्षमतांचा अभिमान बाळगा असं सरन्यायाधीशांनी म्हटलं होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.