Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भयंकर... "भोंदूबाबा अशोक खरात राजकारण्यांना अल्पवयीन मुली पुरवत होता, अन् स्वत:ही..."

भयंकर... "भोंदूबाबा अशोक खरात राजकारण्यांना अल्पवयीन मुली पुरवत होता, अन् स्वत:ही..."


भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आरटीआय कार्यकर्ते आणि माहिती अधिकार अभियानाचे नेते विजय कुंभार यांनी  अत्यंत गंभीर आरोप करत खरातचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचा दावा केला आहे. "अशोक खरात हा राजकारण्यांना अल्पवयीन मुली पुरवत होता," असा थेट आणि खळबळजनक आरोप कुंभार यांनी केला. या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

'रुपाली चाकणकरांना अटक झाली पाहिजे'
विजय कुंभार यांनी याच मुलाखतीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी अनामिकेच्या जखमेबाबत दिलेल्या स्पष्टीकरणावरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. "या प्रकरणाची माहिती रुपाली चाकणकर यांना आधीपासून होती, तरी त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. चाकणकर यांना अटक व्हायला पाहिजे. सुमारे वर्ष-दीड वर्ष त्यांना हा सगळा प्रकार माहिती होता. तरीही त्या चाकणकर बाई त्या बाबाचे उदात्तीकरण करत होत्या. आपले त्याचे चांगले संबंध आहेत.. बाकी सगळं जाऊ द्या.. ते आहेच.. परंतु आता माहिती असताना देखील त्या गप्प राहिल्या. याचा अर्थ त्यांनी या बाबाच्या गुन्ह्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. मी तर म्हणेन त्यांच्या या गुन्ह्यात त्या सामील होत्या. त्यामुळे त्यांना अटक झालीच पाहिजे. " असा आरोप करत कुंभार यांनी चाकणकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.
कुंभार यांनी स्पष्ट केले की, वर्षभरापूर्वीच अशोक खरात यांच्या गैरकृत्यांची तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आली होती. मात्र आयोगाने खरातवर कारवाई करण्याऐवजी बातमी प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पत्र काढले होते. "महिला आयोग भोंदूबाबाला पाठीशी घालत होता का?" असा प्रश्न कुंभार यांनी उपस्थित केला. या सगळ्या आरोपांबाबत विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही पाठवले असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. "रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवणे पुरेसे नाही; त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी," अशी ठाम मागणी त्यांनी केली.



दीपक केसरकरांवर साधला निशाणा
विजय कुंभार यांनी माजी शिक्षणमंत्र्यांवरही निशाणा साधला. "जर शिक्षण मंत्र्यांना अॅस्ट्रोलॉजी आणि अॅस्ट्रॉनॉमी यातील फरक समजत नसेल, तर ते भोंदूबाबांच्या आशीर्वादानेच मंत्रिपद सांभाळत होते का?" असा उपरोधिक सवाल उपस्थित करत त्यांनी खरातसारख्या भोंदूबाबांचा राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर असलेल्या प्रभावाबाबत सवाल उपस्थित केला.

अशोक खरात याला नुकतीच नाशिक पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर बलात्कार, लैंगिक शोषण आणि इतर गंभीर आरोप दाखल झाले आहेत. पोलिसांनी त्याच्या ठिकाणी 58 अश्लील व्हिडिओ आणि इतर पुरावे जप्त केल्याची माहिती आहे. खरात हा स्वघोषित 'कॅप्टन' आणि ज्योतिषी म्हणून राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रभावशाली मानला जात होता.

विजय कुंभार यांच्या या नव्या आरोपांमुळे महाराष्ट्र सरकार आणि महिला आयोगावर नव्या दबावाची शक्यता निर्माण झाली आहे. तृप्ती देसाई यांसारख्या इतर महिला कार्यकर्त्यांनीही यापूर्वीच चाकणकर यांच्या भूमिकेवर टीका केली होती. आता कुंभार यांच्या आरोपांनी प्रकरणाला नवी दिशा मिळाली असून, मंत्रालयापर्यंत पोहोचलेल्या धागेदोऱ्याची चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.